३२ महिन्यात तब्बल एक हजार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:38+5:302021-09-27T04:17:38+5:30

सुनील पाटील जळगाव : जिल्हा अनलॉक झाला, घरबंद करून गावाला जाताय.. तर मग घर सांभाळावेच लागेल, अन्यथा घरात दागिने, ...

One thousand burglaries in 32 months | ३२ महिन्यात तब्बल एक हजार घरफोड्या

३२ महिन्यात तब्बल एक हजार घरफोड्या

googlenewsNext

सुनील पाटील

जळगाव : जिल्हा अनलॉक झाला, घरबंद करून गावाला जाताय.. तर मग घर सांभाळावेच लागेल, अन्यथा घरात दागिने, रोकड किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नका. चोरटे आपल्या घरावर दबा धरून बसले आहेत. २०१९ ते ऑगस्ट २०२१ या ३२ महिन्यात जळगाव जिल्ह्यात तब्बल एक हजार घरफोड्या झाल्या आहेत. चालू वर्षाच्या अवघ्या आठ महिन्यात २५५ घरफोड्या, तर ६५४ चोऱ्या झालेल्या आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी पोलिसांच्याच रेकॉर्डवरील आहे.

२०१९ मध्ये ३६८, २०२० मध्ये ३७७ तर चालू आठ महिन्यात २५५ घरफोड्या झालेल्या आहेत. २०१९ मध्ये ७८ घरफोड्या उघड झाल्या, तर २०२० मध्ये ७६ घरफोड्या उघड झालेल्या आहेत. चालू वर्षात तर ५० ही घरफोड्या उघड नाही. पोलीस ठाणे पातळीवर गुन्हे शोध पथक असो की स्वतंत्र गुन्हे उघडकीस आणणारी यंत्रणा एलसीबी असो दोघेही अपयशी ठरलेल्या आहेत. काही मोठे गुन्हे उघडकीस आले, मात्र त्यात वसुलीदेखील शून्य आहे. सोनसाखळी चोरी, रस्ता लुटीच्या गुन्ह्यात मात्र कामगिरी चांगली असून, त्यात दागिने व रोकडही वसूल झालेली आहे. आता पुढे सणाचे दिवस आहेत. संपूर्ण जिल्हा अनलॉक झाला आहे, त्यामुळे बाहेर जाताना कुलूप बंद घर सांभाळण्याची वेळ घरमालकावरच आली आहे.

कोणत्या वर्षांत किती घरफोड्या?

२०१९ -३६८

२०२० -३७७

२०२१ (ऑगस्टपर्यंत) -२५५

आठ महिन्यांत २५५ घरफोड्या

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात जिल्ह्यात २५५ घरफोड्या झालेल्या आहेत, तर ६५४ चोऱ्या झालेल्या आहेत तर १२०२ दुचाकींची चोरी झालेली आहे. ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. गुन्हे न दाखल झालेली प्रकरणे आणखी वेगळीच आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण चांगले असले तरी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे.

२०० पेक्षा घटनांचा अजूनही ‘तपास सुरू’ !

२५५ घरफोड्या झालेल्या आहेत, त्यातील २०० पेक्षा जास्त घटनांचा तपास अजून सुरूच असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे सध्याच्या तपासाची पद्धतच बदलली आहे. खबऱ्यांचे नेटवर्क कमी झाले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावरच तपास सुरू आहे. पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक असो, की स्थानिक गुन्हे शाखा या दोन्ही यंत्रणांकडून पाहिजे त्या तुलनेत गुन्हे उघडकीस येत नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमाण मात्र त्या तुलनेत चांगले आहे. एकंदरीत चोरटे पोलिसांवर वरचढ ठरल्याची दिसून येत आहे.

अनलॉकनंतर घरफोड्या वाढल्या

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे भूत मानगुटीवर आहे. त्यामुळे सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने या कालावधीत नागरिक घरातच राहिले. त्यामुळे या काळात घरफोडींचे प्रमाण कमी होते. अनलॉक असलेल्या जानेवारी महिन्यात ४१, फेब्रुवारीत ३५ घरफोड्या झाल्या, तर लॉकडाऊन असलेल्या मार्च महिन्यात २२, एप्रिलमध्ये २० घरफोड्या झाल्या. पुन्हा अनलॉक असलेल्या जून महिन्यात ४१, तर ऑगस्ट महिन्यात ३८ घरफोड्या झाल्या. चोऱ्यांचेही प्रमाण तसेच आहे.

Web Title: One thousand burglaries in 32 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.