जळगावात लवकरच एक हजार ऑक्सिजन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:16 AM2021-03-21T04:16:22+5:302021-03-21T04:16:22+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून वाढत गेलेली कोरोना रुग्णांची संख्या सध्या स्थिरावली असून ती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून वाढत गेलेली कोरोना रुग्णांची संख्या सध्या स्थिरावली असून ती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात येणाऱ्या अडचणींवर मात करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे हक्काचे कोविड हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सोबतच शासकीय व खासगी रुग्णालय मिळून लवकरच एक हजार ऑक्सिजन बेडची उपलब्धता राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाच्या या स्थितीविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी लोकमतने संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
प्रश्न - सध्या कोरोनाची स्थिती कशी आहे?
उत्तर - कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून ती स्थिरावला आहे. सध्या ती वाढत नसून ती कमी करण्यावर भर आहे. सध्याच्या स्थितीत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड यांची अडचण येऊ नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे संपूर्णपणे कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रश्न - प्रशासनाच्यावतीने काय उपाययोजना केल्या जात आहे?
उत्तर - स्वतंत्र कोविड हॉस्पिटल करण्यासह ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आणखी २०० ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहे. तसेच शासकीय व खासगी मिळून एकूण १ हजार ऑक्सिजन बेड शहरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रश्न - कोरोना रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे का?
उत्तर - जिल्हास्तरावरून लॉकडाऊनची शक्यता नाही. मात्र नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. जनता कर्फ्यू केला त्यात रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. ज्यांना लॉकडाऊन नको आहे, अशा मंडळींसह सर्वांनीच जबाबदारीने वागल्यास, निर्बंध पाळल्यास लॉकडाऊन आपण टाळू शकतो.
प्रश्न- मृत्यूदराची काय स्थिती आहे?
उत्तर - जिल्ह्याचा मृत्यूदर कमी होऊन तो दोन टक्क्यांच्याही खाली आला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदर अर्ध्या टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मात्र प्रत्येक मृत्यू रोखणे हे महत्त्वाचे असून एकही मृत्यू होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी लक्षणे जाणवताच, त्रास होऊ लागताच तपासणी करून घेतल्यास एक-एक मृत्यू रोखण्यास मदत होऊ शकते.
———————————
वेळेवर तपासणी केल्यास तत्काळ निदान व उपचार होऊन रुग्ण बरा होऊ शकतो. पहिल्याच टप्प्यात त्याची तपासणी झाल्यास तो अगदी साध्या आजाराप्रमाणे बरा होऊन कोणालाही ऑक्सिजनची गरज पडू शकत नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.
———————————
दवाखान्यात गेल्यानंतर टायफाईड असल्याचे सांगितले जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. या दिवसात टायफाईड होत नाही. ती अफवा असून त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
—————————
प्रत्येकाने जबाबदारीने व निर्बंधाचे पालन केल्यास कोरोनापासून बचाव करू शकतो. शिवाय रुग्णसंख्या नियंत्रणात राहिल्यास लाॅकडाऊन सारखी स्थिती येऊ शकत नाही. त्यामुळे नियमांचे पालन करण्यासह लक्षणे जाणवताच तपासणी करा.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.