पोलिसांकडून खंडणी घेताना पत्रकारासह एकाला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:44 PM2020-06-30T12:44:23+5:302020-06-30T12:44:49+5:30
सापळा रचून केली कारवाई
जळगाव : पोलिसांविरूध्द सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून पंचवीस हजाराची खंडणी घेणारा पत्रकार भगवान सुपडू सोनार (रा़ शिरसोली, ता़ जळगाव) व त्याचा साथीदार हितेश आनंदा पाटील (३५, शनिपेठ, जळगाव) यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलात लग्न समांरभ सुरू असून त्याठिकाणी लोकांची चांगलीच गर्दी असल्याचा फोन २५ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आला़ ही बाब पोलीस निरीक्षकांना कळताच त्यांनी पोलीस कर्मचारी विश्वनाथ बाबुलाल गायकवाड व रवींद्र गोरख पाटील यांना कारवाईसाठी पाठविले़
त्याठिकाणी दोन विवाह समारंभ सुरू होते़ तर कुठलेही सुरक्षित अंतर पाळले गेलेले नसल्याचे पोलिसांना आढळून आले. नंतर हॉटेल मालक व स्वयंपाकाचे टेंडर घेतलेल्या इसमाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलवून समज देवून सोडून दिले़ मात्र, त्यानंतर २७ जून रोजी एका साप्ताहिकातील पत्रकार भगवान सोनार याने पोलीस विश्वनाथ गायकवाड यांना फोन केला अन् मी पोलीस ठाण्यातून गेल्यानंतर माझ्या लोकांवर कारवाई केली़ तुमच्या रवी पाटील या पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचे सोमवारी लग्न आहे, त्याठिकाणी अधिक लोक आढळून आल्यास केस दाखल करेल अशी धमकी दिली़
काही वेळानंतर सोशल मीडियावर गायकवाड व रवी पाटील हे रामानंदनगर पोलीस ठाण्यातील कोरोना अशा मथळ्याखाली बदनामीकारक वृत्त दिले आणि ते व्हायरल केले.
साप्ताहिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची व पोलीस खात्याची पत्रकार भगवान सोनार बदनामी करीत असल्याचा प्रकार गायकवाड यांनी त्यांचे मित्र पूनम परदेशी यांना सांगून पत्रकाराला भेटण्याचे सांगितले़ २८ रोजी दुपारी पूनम परदेशी व त्यांचे मित्र योगेश चौधरी यांनी गोलाणी मार्केटमध्ये भगवान सोनार यांची भेट घेतली़ बºयाच वेळ चर्चा झाल्यानंतर बदनामीकारक मजकूर थांबविण्यासाठी ५० हजार रूपयांची खंडणी सोनार याने मागितली़ ही बाब परेदशी यांनी गायकवाड यांनी सांगितली अन् त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला़ त्यामुळे पुन्हा सोनार याने बातमी व्हायरल केली़
पैसे देताच पोलीस धडकले, अन् दोघांनाही रंगेहाथ पकडले...
बदनामीकारक मजकूर थांबवण्यिासाठी मागितलेली रक्कम घेवून पोलीस कर्मचारी यांचे मित्र परदेशी यांच्यासह काही जण अंजिठा चौफुलीजवळील हितेश मोटार्सच्या कार्यालयात पोहोचले व त्यांनी भगवान सोनार यांना ठरलेली रक्कम पंचवीस हजार रूपये दिले़ पैसे दिल्याचे कळताच सापळा रचून असलेले पोलिसांचे पथक हितेश मोटार्सच्या कार्यालयात धडकले़ त्यावेळी त्यांनी खंडणीची रक्कम पंचवीस हजार रूपये ही हितेश याच्याजवळ आढळून आली़ त्यानंतर सोमवारी रात्री पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पत्रकार भगवान सोनार, त्याचा साथीदार हितेश पाटील यांच्या विरूध्द बदनामीकारक मजकूर न प्रसिध्द करण्यासाठी पंचवीस हजार रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
अन्् पोलीस पोहचले
खंडणी देणे योग्य वाटत नसल्यामुळे सोमवारी सकाळी पोलीस कर्मचारी विश्वनाथ गायकवाड व रवीद्र पाटील यांनी सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना संपूर्ण प्रकार सांगितला़ संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर रोहन यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या़ गायकवाड यांनी मित्र पूनम परदेशी यांना बोलवून पैसे कुठे व कसे द्यावे, याबाबत विचारणा करण्यासाठी सांगितले़ परदेशी यांनी सोनार यांचे साथीदार हितेश आनंदा पाटील यांना संपर्क साधून विचारणा केली़ तर पैसे अंजिठा चौफुलीजवळील हितेश मोटार्स येथे घेवून येण्याचे सांगितले़ काही वेळातच पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचला ़