इमारतीवरुन कारागृहात वस्तू फेकताना एकाला पकडले; दोन जण पळून जाण्यात यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 08:02 PM2020-07-28T20:02:47+5:302020-07-28T20:02:57+5:30
याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनूला अटक करण्यात आली आहे.
जळगाव : कारागृहात पिस्तूल फेकणे व बंदी पलायनाचे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी दुपारी पुन्हा सरकारी कर्मचा-यांच्या निवासस्थानावर चढून वस्तू फेकून पलायन केलेल्या सोनू रमेश राठोड (२०, रा.सुप्रीम कॉलनी) याला पाठलाग करून पकडण्यात आले, तर साई उर्फ उमेश आटे व अविनाश शिंदे हे दोघं जण पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनूला अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अमीतकुमार रोहिदास पाडवी (३७) यांची मंगळवारी सकाळी ६ ते दुपारी १ अशी सर्कल अमलदार म्हणून ड्युटी होती.१२.४५ वाजता एका तरुणाचा सरकारी निवासस्थानातील इमारत क्र.२च्या छतावरुन आवाज आला, त्याकडे पाहिले असता तो कारागृहात हातातील पिशवी कारागृहात फेकण्याच्या तयारीत होता. हा प्रकार अधिकारी किरण पवार,गेट किपर कुलदीप दराडे व रक्षक विक्रम हिवरकर यांना सांगून या इमारतीकडे धाव घेतली असता तो धान्य गोदामाच्या दिशेने पळाला, त्याच्यासोबत आणखी दोघं जण होते. पुढे त्याला पकडण्यात यश आले मात्र दोघं जण पळून गेले. चौकशीअंती पकडलेल्या तरुणाचे नाव सोनू राठोड असल्याचे निष्पन्न झाले तर पिशवीत साबण, ब्रश, शर्ट, बीडी बंडल व इतर साहित्य होते. कारागृहात असलेल्या दिनकर रोहिदास चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी) याच्यासाठी हे साहित्य त्याने आणले होते.
पोलिसांकडून पाहणी
या घटनेनंतर कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी पकडलेल्या तरुणाला जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अकबर पटेल, सहायक निरीक्षक सचिन जाधव व महेंद्र बागुल यांनी कारागृहात भेट देऊन घटनेची माहिती घेत परिसराची पाहणी केली. फरार झालेल्या दोघांची माहिती काढून त्यांच्या शोधार्थ पथक रवाना केले. रक्षक अमीतकुमार तडवी यांच्या फिर्यादुवरुन सोनू राठोड, उमेश आटे व अविनाश शिंदे या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.