दुष्काळग्रस्त परिसरात रेन पाईप ठिबक संचाद्वारे कांदा लावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 09:23 AM2019-01-04T09:23:10+5:302019-01-04T09:33:03+5:30
माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.
हर्षद गांधी
निजामपूर : माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.
यंदा वर्षभरात केवळ एक पाऊस झाला. परिणामी निजामपूर, जैताणे परिसरात भीषण दुष्काळ पसरला आहे. शेतांमधील विहिरी, बोअर आटलेत. जे थोडे फार पाणी आहे त्यात कांदा लावणे कठीण असल्याचे शेतकरी म्हणतात. परिणामी या भागात कांदा लावणीचे प्रमाण तुलनेने फारच कमी झाले आहे.
जेवढ्या क्षेत्रात गहू लावून उत्पन्न येते त्यापेक्षा कांद्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी गव्हापेक्षा केव्हाही कांदा लावणे पसंत करतात. पाणी नाही ही अडचण आता पुढे येते आहे. परंतु अल्प प्रमाणातील पाण्याचा रेन पाईप ठिबक सिंचन पद्धतीने वापर करून उपलब्ध पाण्यात कांद्याचे पीक घेता येते, हे सिद्ध झाल्याने शेतकरी त्याकडे वळत आहे.
निजामपूर, उमरांडी, जैताणे शिवारात काही शेतकऱ्यांकडून इतरत्र बसविले जातात तसे ‘रेन पाईप ठिबक संच’ लावून कांदा लावणी करण्यात येत आहे. या ठिबक सिंचन संचाद्वारे उभ्या पाईपमधून 14 फुटाच्या गोल परिसरात पावसासारखे फवारे उडतात. त्यामुळे पुरेसे पाणी मिळून पिकाची चांगली वाढ होते. यामुळे पाणी सुद्धा कमी लागत असल्याची माहिती रुपेश श्रीधर राणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतात रांगडा कांदा लावणी केली आहे. त्यांनी अपेक्षिल्याप्रमाणे ही लावणी झाली आहे. हा प्रयोग या क्षेत्रात नवीन असून साधारणत: 20 ते 25 टक्के शेतकऱ्यांनी हे ठिबक संच बसविले असल्याचे शेतकरी राणे यांनी नमूद केले. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 12 ते 13 हजार रुपये खर्च आला आहे. या पद्धतीने उपलब्ध पाण्यावर कांदे लावणीचे क्षेत्र दुप्पटीने वाढू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या ठिबक पद्धतीने पाइपाच्या दोन्ही बाजूस 7-7 फूट अंतरापर्यंत स्प्रेच्या सहाय्याने पिकांना पावसाप्रमाणे पाणी मिळते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
साक्री तालुक्यातील यंदा दुष्काळग्रस्त घोषित निजामपूर, जैताणे व पश्चिमेकडील कोकणपट्टीत यंदा भीषण दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी हे ‘रेन पाईप ठिबक संच’ बसवून उपलब्ध अल्प पाण्यावर कांद्याची लावणी केली आहे.
- रूपेश श्रीधर राणे,शेतकरी, निजामपूर, ता.साक्री