‘पाईप एअर’ने कांदा आठ महिने राहतो सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:25+5:302021-07-05T04:12:25+5:30
ही डोकेदुखी थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून येथून जवळच असलेल्या चिंचखेडे येथील सत्यजित निकम या तरुणाने ...
ही डोकेदुखी थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून येथून जवळच असलेल्या चिंचखेडे येथील सत्यजित निकम या तरुणाने एक माॅडेल विकसित केले आहे. त्याचे नाव आहे पाईप एअर. शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चात जास्त फायदेशीर, असे हे माॅडेल असून याचा वापर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कांदा चाळीमध्ये करायचा आहे, हा प्रयोग केल्यास शेतकऱ्यांना कांदा ७ ते ८ महिने इकडून तिकडे हलवायची गरज नाही. कांदा एकदम सुरक्षित राहतो, असा दावा त्याने केलेला आहे.
सद्य:स्थितीत त्याने घरगुती टाकाऊ वस्तूंपासून हे माॅडेल बनविले आहे. आजूबाजूला तारेची जाळी मारून वरून पत्र्याचे झोपडी टाईप छत करून कांदा चाळ बनविली आहे. यात अर्धा इंची पाईपाचे गरजेनुसार तुकडे करून त्याला ठिकठिकाणी एलगो, व टीचा वापर करून कांदा चाळीतील एका बाजूकडून खाली तीन ठिकाणी व वर तीन ठिकाणी एक, दीड फुटाचे पाईप सोडले आहेत. ही फिटिंग झाल्यानंतर पत्र्याच्या छतावर ही पाईपलाईन पूर्ण करून वरती नरसाळासाठी एक पाण्याची बाटली कापून तिच्या पुढे एक पंखा बसविला आहे. हा पंखा जस जसा फिरेल तस तशी नरसाळ्याद्वारे हवा आत ओढली जाईल व ती पाईप फिंटिंगद्वारे चाळीतील साठवून ठेवलेल्या कांद्यामध्ये सोडली जाईल. यामुळे कांद्याला हवा मिळून कांदा सुरक्षित राहील.
हे माॅडेल शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आपल्या कांदा चाळीवर केल्यास, त्या ठिकाणी एक अडीच, तीन इंचीचा मेन पीव्हीसी पाईप, आकाराप्रमाणे नरसाळे, त्याला एक एक्झाॅस्ट फॅन, खालची सबफिटींगमध्ये दीड, दोन इंचीचा पाईप, त्याला मापाप्रमाणे एलबो, टी, अशी कमी खर्चात फिटिंग करता येईल व फॅनद्वारे बाहेरील शुद्ध हवा पाईप फिंटिंगद्वारे आतमध्ये घेऊन ती कांदा चाळमध्ये सोडली जाईल. शक्यतो सकाळी, सकाळी चार, पाच वाजता याचा वापर करावा. कारण सकाळी हवा शांत व थंडगार असते. ही हवा कांद्याला एक पोषक वातावरण निर्माण करते. दिवसा याचा वापर शक्यतो करू नये. कारण दिवसा हवा उष्ण व दमट असते. ती कांद्याला मारक ठरू शकते, असे सत्यजित निकम याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
040721\04jal_7_04072021_12.jpg
सत्यजीत निकम याने तयार केलेले हेच ते पाईप एअर माॅडेल.