बांधकाम व्यावसायिकाला आॅनलाईन गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 09:55 PM2019-11-25T21:55:34+5:302019-11-25T21:55:52+5:30
परस्पर काढले १४ हजार : रामानंद पोलिसात तक्रार
जळगाव : बांधकाम व्यावसायीक विनोद शालीग्राम पाटील (रा.पार्वती नगर) यांच्या बॅँक खात्यातून आॅनलाईन परस्पर १४ हजार २०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विनोद पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
विनोद पाटील यांचे काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत खाते आहे. रविवार दि.२४ रोजी कामानिमित्त ते नाशिक येथे गेले होते. दरम्यान गाडीत डिझेल भरत असताना त्यांना सकाळी १०.४९ वाजता मोबाईलवर एसएमएस आला. त्यांच्या बॅँक खात्यातून १० हजार रुपये तसेच ४ हजार २०० रुपये परस्पर वळविण्यात आले. पैसे काढल्याचा संदेश आला तेव्हा एटीएम पाटील यांच्याच खिशात होते. एटीएम खिशात असतांना पैसे कोणी काढले म्हणून त्यांना संशय आला. याबाबत त्यांनी बँकेला कळविले. बॅँकेच्या माहितीनुसार ही रक्कम मुंबई उपनगरातून एटीएममधून काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
आॅनलाईन फसवणुकीचा हा नवा फंडा
विनोद पाटील यांचे एटीएम खिशात असताना ही फसवणुक झाली. एकतर त्यांचा पासवर्ड कुणाला तरी माहिती असावा असा तर्क लावला जात आहे. परंतु पाटील यांच्या माहितीनुसार आपण कोणालाही पासवर्ड दिला नसल्याचे सांगितल्याने आॅनलाईन फसवणुकीचा हा नवा फंडा असल्याचे घटनेतून समोर आले आहे. या प्रकरणी आपण पोलिसात तक्रार दिली आहे.