युवा सप्ताहानिमित्त झाल्या ऑनलाईन सूर्यनमस्कार स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:37+5:302021-01-17T04:14:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे दिनांक १२ ते १९ जानेवारी हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने दिनांक १४ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा हौशी योग असोसिएशनच्या सहकार्याने सूर्यनमस्कार स्पर्धा ऑनलाईन लाईव्ह घेण्यात आल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी योग व सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. कोरोनामुळे कोणतेही खेळ वा स्पर्धा कार्यक्रम झाले नाहीत. परंतु, कोरोनाचा अडथळा पार करून ऑनलाईन लाईव्ह योगाच्या स्पर्धांचे अखंडित व सातत्यपूर्ण आयोजन आंतरराष्ट्रीय योग पंच व मार्गदर्शक डॉक्टर अनिता पाटील यांनी केले.
क्रीडा अधिकारी सुजाता चव्हाण यांनी दोन गटात होणाऱ्या ऑनलाईन लाईव्ह सूर्यनमस्कार स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी पंच म्हणून रुद्राणी देवरे, अर्चना महाजन व ज्योती भांडारकर यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून सुमनांजली बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुमन रहाणे, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी, जळगाव जिल्ह्याच्या सचिव अर्चना महाजन, महावितरण जळगाव ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता सतीश पाटील, जळगाव जिल्हा असोसिएशनच्या सचिव डॉक्टर नीता पाटील यांनी दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीला पुष्पहार घालून स्पर्धेला सुरुवात केली. या कार्यक्रमाची तांत्रिक जबाबदारी सुशील तळवेलकर यांनी सांभाळली.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे
१५ ते २० वयोगट मुली : चेतना नितीन देवरे - प्रथम, पूर्वा जयंत महाजन - द्वितीय, गौरी बागुल- तृतीय, १५ ते २० वयोगट मुले : जय प्रवीण पाटील - प्रथम, सागर देशमुख - द्वितीय, पार्थ पाटील - तृतीय, २१ ते २९ वयोगट युवती : निकिता चौधरी - प्रथम, नम्रता चौधरी - द्वितीय, २१ ते २९ वयोगट युवक : प्रसाद भाऊसाहेब पाटील - प्रथम.