ऑनलाइन टास्क पडला महागात ; रेल्वे कर्मचाऱ्याला घातला २ लाख ९४ हजारांचा गंडा
By विलास.बारी | Published: May 17, 2023 06:13 PM2023-05-17T18:13:19+5:302023-05-17T18:13:39+5:30
ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
जळगाव : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. यू-ट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगून नंतर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली भोईटे नगरातील मनोजकुमार सुनहरिलाल राज (४५) या रेल्वे कर्मचाऱ्याची २ लाख ९४ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
यू-ट्यूब चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर प्रत्येक सबस्क्राईबला ५० रूपये मिळतील,असा एसएमएस सोमवार,दि.८ मे रोजी मनोजकुमार यांना त्यांच्या मोबाइलवर आला होता. ८ ते ११ मे या कालावधीमध्ये केलेल्या सबस्क्राईबची त्यांच्या खात्यावर ४ हजार ३५० रुपयांची रक्कम आली. दरम्यान, ९ मे रोजी त्यांना प्रीपेड प्रमोशन केले तर ४० टक्के फायदा होईल असे सांगून मनोजकुमार यांच्याकडून सायबर ठगांनी वेळोवेळी एकूण २ लाख ९४ हजार ५०० रूपये यूपीआय आयडीवर भरण्यास सांगत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.