प्राध्यापकांच्या नियमित पगाराची फक्त १० महाविद्यालयांना काळजी!
By अमित महाबळ | Published: September 7, 2023 07:18 PM2023-09-07T19:18:41+5:302023-09-07T19:19:15+5:30
जुलै व ऑगस्ट महिन्याचे शिक्षकांचे मानधन थकित आहे.
जळगाव : तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे मानधन त्याच महिन्यात निघायला पाहिजे म्हणून उच्चशिक्षण सहसंचालकांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून गेल्या मानधनाचे प्रस्ताव दि. ४ सप्टेंबरपर्यंत सादर करावेत, असे कळवले होते. त्याला खान्देशातून केवळ १० महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला आहे.
तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांना नऊ महिन्यांसाठी नियुक्ती मिळते. प्रत्यक्षात मात्र परीक्षा आणि वेगवेगळ्या सुट्यांचा कालावधी वजा जाता पाच महिन्यांचे मानधन त्यांच्या हातात येते. मात्र तेही नियमित नसते. या मानधनाचे प्रस्ताव महाविद्यालयांकडून उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठवले जातात. त्यामध्ये विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एप्रिल २०२३ मध्ये उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून दर महिन्याच्या २ तारखेला मानधनाचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात सादर करावेत, असे कळवले होते. मानधनाचे प्रस्ताव वेळेत न येणे, त्यात त्रुटी असणे आदी अनेक मुद्दे यामध्ये आढळून आले होत्या.
खान्देशात ८२ महाविद्यालये
दरम्यान, जुलै व ऑगस्ट महिन्याचे शिक्षकांचे मानधन थकित आहे. त्याचे प्रस्ताव दि. ४ सप्टेंबरपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, खान्देशातील अनेक महाविद्यालयांनी उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ८२ अनुदानित महाविद्यालये आहेत. त्यापैकी केवळ १० महाविद्यालयांनी वेळेत प्रस्ताव सादर केले आहेत.
वेळापत्रकाचे काय ?
तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीसाठी १७ ऑक्टोबर २०२२ च्या अध्यादेशानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. कार्यभार तपासणी, ना-हरकत प्रमाणपत्र मागणी, ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करणे, जाहिरात प्रसिद्ध करणे, अर्ज तपासणी, मुलाखत, उमेदवाराची निवड, नेमणूक आदेश देणे, विद्यापीठ मान्यता, तासिका तत्वावरील अध्यापकाची सेवा उपलब्ध करून देणे ही सर्व कार्यवाही १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत पूर्ण करायची आहे. या वेळापत्रकाचे पालन झाले असते तर मानधन वेळेत निघाले असते, असा दावा प्राध्यापक संघटना करत आहे.
अधिकारी म्हणतात...
तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन त्याच महिन्यात निघावे म्हणून महाविद्यालयांनी मानधनाचे प्रस्ताव दर महिन्याच्या २ तारखेला सादर करावेत, असे प्राचार्यांना कळवले होते. सप्टेंबर महिन्यात मागील प्रस्तावांसाठी दि. ४ पर्यंतची मुदत होती. या मुदतीत १० महाविद्यालयांचे प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालक संतोष चव्हाण यांनी दिली.