चार दिवसांत फक्त ११५ प्रवाशांनी घेतला लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:11+5:302021-01-23T04:17:11+5:30
कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चपासून बंद असलेली राजधानी एक्स्प्रेस महिनाभरापासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली ...
कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्चपासून बंद असलेली राजधानी एक्स्प्रेस महिनाभरापासून पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली असून, ही गाडी आठवड्यातून चार दिवस धावत होती. त्यामुळे ही गाडी दररोज धावण्याबाबत प्रवाशांमधून मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात येत होती. याबाबत गेल्या महिन्यात खासदार उन्मेश पाटील यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेटही घेतली होती. खासदारांची ही मागणी मान्य करून, रेल्वे प्रशासनातर्फे १९ जानेवारीपासून दररोज मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सोडण्यात येत आहे.
इन्फो :
प्रवाशांचा मात्र अत्यल्प प्रतिसाद :
१९ जानेवारीपासून दररोज धावणाऱ्या या राजधानी एक्स्प्रेसला जळगाव स्टेशनवर चार दिवसांत अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या गाडीला भुसावळ स्टेशनवरही थांबा नसल्यामुळे, दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना जळगावला यावे लागते. नाशिकनंतर जळगावलाच थांबा असतानाही या गाडीला फारसा प्रतिसाद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये १९ जानेवारी रोजी जळगावहून ११ प्रवासी बसले, २० जानेवारीला ४१ प्रवासी, २१ रोजी १७ प्रवासी तर २२ रोजी ४६ प्रवासी गेले. चार दिवसांत फक्त ११५ प्रवाशांनी लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश प्रवासी हे भोपाळ व आग्रा स्टेशनपर्यंतच जात असल्यामुळे, या गाडीला फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे.