जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त १३ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:27 PM2019-05-04T12:27:01+5:302019-05-04T12:27:36+5:30
तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.७४ टक्के साठा, ८ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट
जळगाव: जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून अल्प पावसामुळे धरणांमध्ये देखील कमीच पाणीसाठा झाला होता. त्यामुळे एप्रिल संपत आला असताना जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये एकूण १२.६७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.७४ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला २४.९६टक्के पाणीसाठा होता.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्के कमीच म्हणजे सुमारे ६८ टक्के पाऊस झाला. त्यातही पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिला. वाहून निघेल असा पाऊस फारच कमी प्रमाणात झाल्याने धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही.
८ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ान्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, बहुळा या ८ प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरीत सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर व गूळ या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण १०.२० टक्के पाणीसाठा आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्येही मोजकाच साठा
१०० टक्के भरूनही हतनूरमध्ये सध्या ३.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात २०.०४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
गिरणा धरणात मात्र गतवर्षीच्या तुलनेत थोडा अधिक साठा यंदा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी गिरणात १७.२७ टक्के पाणीसाठा होता. सध्या गिरणात १८.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणाची स्थिती मात्र बिकट आहे. धरणात सध्या १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी ४६.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
लघुप्रकल्प कोरडेच
जिल्ह्यातील ९६ लघुप्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेच असून सर्व प्रकल्प मिळून जेमतेम ४.४० टक्के पाणीसाठा आहे.