६७ वर्षात केवळ १४ महिलांनी लढवली लोकसभेची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:08 AM2019-03-25T11:08:10+5:302019-03-25T11:09:06+5:30

खान्देशातील स्थिती

Only 14 women contested in 67 years of Lok Sabha election | ६७ वर्षात केवळ १४ महिलांनी लढवली लोकसभेची निवडणूक

६७ वर्षात केवळ १४ महिलांनी लढवली लोकसभेची निवडणूक

Next
ठळक मुद्देरक्षा खडसे, हीना गावित ठरल्या पहिल्या महिला खासदार


जळगाव/धुळे/नंदुरबार : लोकसभेच्या १९५२ मध्ये झालेल्या निवडणुकांपासून आजपर्यंत खान्देशातील जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार या चार मतदार संघातून आतापर्यंत केवळ १४ महिलांनी उमेदवारी केली आहे. राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
जळगाव व रावेरमध्ये यंदा दोन्ही महिला
भाजपाकडून जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी यंदा प्रथमच दोन्ही महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव लोकसभा मतदार संघाच्या ६७ वर्षाच्या इतिहासात केवळ तीनच महिलांनी लोकसभा निवडणूक लढवली असून, स्मिता वाघ या चौथ्या महिला उमेदवार ठरणार आहेत.
रक्षा खडसे पहिल्या महिला खासदार
रावेर मतदार संघात सहा महिलांनी आतापर्यंत निवडणूक लढली असून, २०१४ मध्ये रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार होत्या.
१९५२ पासून २०१४ पर्यंत १९ वेळा लोकसभानिवडणुकीत जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघ मिळून ९ महिलांनी निवडणूक लढवली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात आतापर्यंत एकही महिला उमेदवार विजयी झालेल्या नाहीत. तर २०१४ मध्ये भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार मनिष जैन यांचा सुमारे ३ लाख मतांनी पराभव करत जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळवला.
राजकीय वारसा नसल्याने रावेरमध्येही मिळाले नाही महिलांना यश
रावेर मतदार संघात १९९१ मध्ये सुमन मुरलीधर बोदवडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना केवळ ९८ मते मिळाली. १९९६ मध्ये जोहराबाई तडवी यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली. त्यांना ७११ मते मिळाली. २००९ मध्ये सुजाता इब्राहीम तडवी यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना ६ हजार मते मिळाली होती. २०१४ मध्ये तीन महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. यामध्ये माजी मंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासोबत भुसावळ येथील बांधकाम व्यवसायिक सानिया कादरी व शहाराबी शेख यांचा समावेश होता. यामध्ये रक्षा खडसे यांनी तब्बल ३ लाख मतांनी विजय मिळवला.
१९९६ मध्ये पहिल्यांदाच महिला उमेदवाराने लढवली निवडणूक
तत्कालीन एरंडोल मतदारसंघ व आताच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात १९५२ पासून ते १९९१ पर्यंतच्या निवडणुकीत एकाही महिला उमेदवाराने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. १९९६ मध्ये पहिल्यांदाच इंदिराताई भानुदास पाटील (विटनेर ता.चोपडा)यांनी जनता पार्टीकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना ९ हजार ९२० मते मिळाली. इंदिराताई पाटील या शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी होत्या.
१९८९ मध्ये विटनेर ग्रा.पं.मध्ये निवडणूक बिनविरोध करत यामध्ये सर्व महिला सदस्यांचा समावेश करत महिला सरपंच होण्याचा मान देखील मिळवला. १९९८ मध्ये मिरा पाटील यांनी १९९८ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना केवळ १ हजार मते मिळाली. तर २०१४ मध्ये आशा पाटील यांनी महाराष्टÑ परिवहन सेनेकडून निवडणूक लढवली होती. इंदिरातार्इंसह तिन्ही महिला उमेदवारांना राजकीय वारसा नाही.
जळगावात प्रथमच भाजपाकडून महिला उमेदवार
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून पहिल्यांदाच महिला उमेदवारला संधी देण्यात आली आहे. स्मिता वाघ या विद्यमान विधानपरिषदेच्या आमदार असून, त्यांच्यासमोर राष्टÑवादी कॉँग्रेसचे गुलाबराव देवकर यांचे तगडे आव्हान आहे.
धुळे मतदारसंघात आतापर्यंत एकमेव महिला उमेदवार
४धुळे लोकसभा मतदार संघाच्या इतिहासात रजनी ठाकूर या एकमेव महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांनी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघातर्फे उमेदवारी केली होती. त्यांना १ हजार ७२१ (०.२६ टक्के) मते मिळाली होती. त्यांच्याव्यतिरिक्त १९५२ पासून २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये अन्य कोणत्याही महिलेने निवडणूक लढविलेली नाही. राजकीय पक्षांनीही महिला उमेदवार देण्यात स्वारस्य दाखविलेले नाही.

नंदुरबारमध्ये केवळ चारच महिलांची उमेदवारी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ चारच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. त्यातही एका महिला उमेदवाराने दोन वेळा नशीब अजमवले आहे. गेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या डॉ.हिना गावीत या दुसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत.
नंदुरबार मतदारसंघ आधीपासूनच अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी राखीव आहे. पहिल्या निवडणुकीपासून चार पेक्षा अधीक उमेदवारांनी भाग्य आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वाधिक ९ उमेदवार २००९ च्या निवडणुकीत होते. आतापर्यंत एकुण ५४ मतदारांनी भाग्य अजमवले आहे. त्यात केवळ तीन निवडणुकीत महिलांनी उमेदवारी केली आहे. दोन वेळा माकपच्या भुरीबाई शेमळे या रिंगणात होत्या. भुरीबाई शेमळे यांनी १९८० व १९९९ च्या निवडणुकीत उमेदवारी केली होती. तर २००९ च्या निवडणुकीत बबीता पाडवी व मंजुळाबाई कोकणी या दोन महिला उमेदवारांनी नशीब अजवमले होते. गेल्या अर्थात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा तर्फे डॉ.हिना गावीत यांनी उमेदवारी करून विजय मिळविला होता.

Web Title: Only 14 women contested in 67 years of Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.