फळपीक विमा योजनेत ८६ पैकी ३ महसूलमंडळेच ठरली पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:21+5:302021-07-07T04:21:21+5:30

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा ...

Only 3 out of 86 revenue boards are eligible for fruit crop insurance scheme | फळपीक विमा योजनेत ८६ पैकी ३ महसूलमंडळेच ठरली पात्र

फळपीक विमा योजनेत ८६ पैकी ३ महसूलमंडळेच ठरली पात्र

Next

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या निकषात सन २०२०-२०२१ या वर्षासाठी केलेल्या बदलाचा फटका जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत यावर्षी जिल्ह्यातील ८६ पैकी केवळ ३ महसूल मंडळेच निकषांमध्ये पात्र ठरली आहेत. इतर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीकविम्यासाठी भरलेली रक्कम देखील मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन विमा कंपनीला मात्र मोठा फायदा होणार आहे.

सन २०२०-२०२१ या वर्षासाठी राज्य शासनाने निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जाचक निकषांचा फटका यावर्षी जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण बदललेल्या निकषांमध्ये अनेक महसूल मंडळे पात्रच ठरू शकलेली नाही. जिल्ह्यात एकूण ८६ महसूल मंडळे असून, यामधील जळगाव तालुक्यातील भोकर, चोपडा तालुक्यातील अडावद व यावल तालुक्यातील भालोद ही तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

तीनच महसूल मंडळात तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त राहिले

यावर्षीच्या निकषांमध्ये ज्या भागात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान सलग ८ ते १४ दिवस ४५ किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिले असाच भाग विम्याचा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार होता. त्यानुसार केवळ तीनच महसूल मंडळे पात्र ठरली आहेत. इतर ८३ महसूल मंडळांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमानाचा निकष पूर्ण होऊ शकलेला नाही. जुन्या निकषांमध्ये ४५ पेक्षा अधिक तापमान राहिल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम ही हेक्टरी ४१ हजार रुपयांपर्यंत मिळत होती. मात्र, यावर्षी नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना केवळ १३ हजार रुपयांची नुकसानभरपाईची मिळणार आहे.

पात्र असलेल्यांनाही मिळणार नाममात्र रक्कम

१. राज्य शासनाने बदल केलेल्या निकषांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांनीच विमा काढला होता. २०१९-२०२० या वर्षासाठी जिल्ह्यातील ५२ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला होता. त्यातच तीनच महसूल मंडळे निकष पार करू शकली असल्याने या मंडळांतील ६ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे.

२. नुकसान भरपाईची रक्कमदेखील कमी असल्याने शेतकऱ्यांना नाममात्रच रक्कम मिळणार आहे. तर इतर ३६ हजार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी हेक्टरी ७ हजार रुपयांप्रमाणे भरलेली विम्याची रक्कम देखील मिळणे कठीण होणार आहे. दरम्यान, रावेर, यावल व मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वादळामुळे नुकसान झाल्याची रक्कम मिळणार आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्याला मिळाली होती ३६० कोटींची भरपाई

२०१९-२०२० मध्ये जाचक निकष नसल्याने जिल्ह्यातील ८६ पैकी जवळपास सर्वच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी सुमारे ३६० कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र, यावर्षी ३० ते ४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षासाठी मात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य शासनाने फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करून, पूर्वीप्रमाणेच २०२१-२०२२ या वर्षासाठीचे निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याच तोडीची नुकसानभरपाई मिळणार आहे. यावर्षी जरी शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी पुढील तीन वर्षांसाठी मात्र शेतकऱ्यांना लाभ होईल अशी माहिती करंज येथील शेतकरी कृषीभूषण अनिल जीवराम सपकाळे यांनी दिली.

Web Title: Only 3 out of 86 revenue boards are eligible for fruit crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.