चारठाणा तलावात केवळ ३० टक्के साठा
By Admin | Published: March 2, 2017 12:14 AM2017-03-02T00:14:00+5:302017-03-02T00:14:00+5:30
२०१५-२०१६ : इंदिरा आवास योजना; ९० दिवसांच्या रोजगाराचीही हमी
मुक्ताईनगर : तालुक्यातील चारठाणा वनविभागात येणाºया भवानी तलाव व भाटी धरणातील पाणीसाठा फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासूनच अतिशय कमी झाल्याने उन्हाळ्यापूर्वीच जलाशयांना लागलेल्या ओहोटीमुळे भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह वन्यजीव प्राण्यांनादेखील तहानलेले राहावे लागणार असल्याचे काहीसे भयावह चित्र निर्माण झाले आहे.
२०१६ च्या पावसाळ्यात पावसाची जोरदार सुरुवात झाली असली तरी पावसाचा जोर मात्र शेवटपर्यंत टिकला नाही. सुरुवात व नंतरच्या काळात सर्वाधिक काळ वातावरण ढगाळ राहिले. केवळ हलक्या सरींमुळेच जलाशये भरलीच नाहीत. पावसाळाअखेर चारठाणा वनविभागाच्या हद्दीत येणाºया भवानी परिसरातील तलावात केवळ ६० टक्केच पाणी साचले तर त्यापेक्षा मोठ्या असलेल्या भाटीच्या धरणात क्षमतेच्या केवळ ७० ते ७५ टक्के एवढेच पाणी तलावात साचले.
मध्यंतरी हिवाळ्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पाण्याची पातळी खालावली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पाणी पातळी पूर्णपणे खालावली असून सद्य:स्थितीत भवानी धरणात केवळ ३० टक्के तर भाटीच्या धरणात केवळ ४० टक्के एवढाच जलसाठा शिल्लक आहे.
उन्हाळा सुरू होण्याआधीच जलाशये आटल्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे चारठाणा वनहद्दीत जवळपास सात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असून प्राणी पाण्यासाठी या दोन्ही तलावावर आधारित असतात. उन्हाळ्यात तलावांचे पाणी आटल्यास वन्यजीव प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे वन्यजीव प्राण्यांचे जीव धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांसाठी शासन पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी विविध योजनांद्वारे पाणी पुरवले जाईल, मात्र वन्यजीव प्राण्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील.सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य चारठाणा तलाव आणि भाटीचे धरण यातील पाणीसाठा कमी झाला. हा परिसर पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाचा आहे. या शिवाय अन्य वन्य प्राण्यांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर आहे. जंगलातील धरणांमधील पाणीसाठे कमी झाले.त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांनादेखील याची झळ बसणार असल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची आतापासूनच व्यवस्था करणे वनविभागासाठी गरजेचे आहे. तसे नियोजन केल्यास समस्या कमी होईल. यासाठी पुढाकार घेणे क्रमपात्र आहे.