जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:57+5:302021-02-06T04:27:57+5:30
जळगाव : शाळांनंतर आता महाविद्यालयेही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पन्नास टक्के क्षमतेने राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू ...
जळगाव : शाळांनंतर आता महाविद्यालयेही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पन्नास टक्के क्षमतेने राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली असून, तसे परिपत्रक त्यांनी काढले आहे. दरम्यान, हे परिपत्रक गुरुवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ई-मेलद्वारे प्राप्त झाले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊनच महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना परवानगीसाठीचे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव बी. व्ही. पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्यासह जिल्ह्यातील महाविद्यालये कोरोना महामारी काळात ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. मात्र, आता कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याबाबतचे परिपत्रकसुध्दा विद्यापीठाला गुरुवारी प्राप्त झालेले आहे. कोरोना प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती तसेच आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी यांच्या सहमतीनंतर महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे त्या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता मिळावी, यासाठी गुरुवारी विद्यापीठाकडून पत्रक तयार करण्यात आले आहे. हे पत्र शुक्रवारी तिन्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविले जाईल.
दुपारी २ वाजता विद्या परिषदेची बैठक
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाली असल्यामुळे आवश्यक ती माहिती देण्यासाठी शुक्रवारी दुपारी २ वाजता ऑनलाईन विद्या परिषदेची बैठक बोलावण्यात आली आहे. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. प्र-कुलगुरू, कुलसचिव यांचाही बैठकीत समावेश असेल.
प्राचार्यांची बैठक बोलाविली...
महाविद्यालये सुरू करण्याबाबतची तयारी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा, यासोबत काय काळजी घेता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी व आवश्यक सूचना करण्यासाठी शुक्रवारी दुपारी ४ वाजता प्राचार्यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्राचार्यांचा समावेश असेल.
लाखापेक्षा अधिक विद्यार्थी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. खान्देशात सुमारे दोनशेच्यावर महाविद्यालये आहेत. जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा कॉलेज कॅम्पस गजबणार आहे. महाविद्यालयातील जागेची उपलब्धता पाहून पन्नास टक्केपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पध्दतीने वर्गात प्रवेश दिला जाईल.