हमी भावाची केवळ घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:40+5:302020-12-08T04:13:40+5:30

जळगाव : शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारकडून कृषी मालासाठी हमी भावाची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात ...

Only the announcement of Hami Bhav, the pastoral disappointment of the farmers | हमी भावाची केवळ घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

हमी भावाची केवळ घोषणा, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Next

जळगाव : शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा यासाठी सरकारकडून कृषी मालासाठी हमी भावाची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी हे भाव पडतच नसल्याचे चित्र आहे. हमी भाव व शेतकऱ्यास प्रत्यक्षास मिळणारा भाव यात निम्म्याचा फरक असून हमी भावाची केवळ घोषणा होते, त्याची अंमलबजावणीदेखील व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कृषी विधेयकाला विरोध व विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून मंगळवारी विविध संघटनांच्यावतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरच हमी भावाचा लाभ होत आहे का, या विषयी माहिती घेतली असता शेतकरी या हमी भावापासून कोसो दूर असल्याचे सांगण्यात आले.

अटींच्या भोवऱ्यात अडकला कृषी माल

शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळावा म्हणून सरकारने यंदा हमी भावात वाढ केली. ही वाढ पाहता ती किरकोळ असल्याचेच चित्र असून वाढ तर सोडा पूर्वीचा हमी भावदेखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मुळात शेतकऱ्यांनी हमी भावाची मागणी केली तरी त्याला दर्जाची अट घालून केवळ एफएक्यू दर्जाचा माल हमी भावाने घेतला जाईल, असे सांगितले जात असल्याचे चित्र आहे.

हमी भावापेक्षा खरेदी दर निम्मे

सोमवारी खरेदी दर व हमी भाव पाहिले तर मोठी तफावत त्यात दिसून आली. कापसाला पाच हजार ८०० रुपयांचा दर घोषित केला असताना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार हजार २०० ते चार हजार ५०० रुपयांचाच भाव दिला जात आहे. अशाच प्रकारे उडीदासाठी सहा हजार हमी भाव जाहीर झाला असताना शेतकऱ्यांच्या हाती तीन ते साडे तीन हजार रुपयांचाच दर पडला. मुगाला सात हजाराचा भाव असताना तीन हजार ५०० ते चार हजार रुपयेच भाव दिला जात आहे. मक्याला एक हजार ८५० रुपये हमी भाव घोषित असताना शेतकऱ्यांना ९०० ते एक हजार रुपये भाव मिळाला. एवढी मोठी तफावत प्रत्येक कृषी मालात असून शेतकऱ्यांसाठी हमी भाव म्हणजे केवळ घोषणाच ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अनंत अडचणींचा सामना

कृषी मालाचा विचार केला तर मोजक्याच पिकांना हमी भाव दिला जातो. अजूनही ९० ते ९५ टक्के पिकांना हमी भावाची घोषणाच होत नाही. उडीद, मूग, मका, कापूस, सोयबीन, हरभरा व इतर मोजक्याच पिकांना हमी भावाची घोषणा होते. मात्र या कृषी मालाचीही पूर्ण खरेदीच होत नाही त्यामुळे हमी भाव दूरच राहतो. खरेदी केंद्रावरदेखील विक्रीचा विचार केला तरी तेथे एकतर गोदामात जागा नसते, बारदाण नसतात, अशा अनेक अडचणींचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

—————————-

कृषी मालासाठी हमी भावाची केवळ घोषणा केली जाते. प्रत्यक्षात अजूनही शेतकऱ्यांना घोषित झालेला भाव मि‌ळत नाही. हमी भावासाठी घालण्यात येणाऱ्या अटी यामुळे शेतकरी मेटाकुटीस येतो.

- किशोर चौधरी, शेतकरी तथा अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी मंडळ, असोदा.

केंद्र सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हमी भाव देते. तो अजून वाढविला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे. मात्र अजून पाचच टक्के काम झाले असू ९५ टक्के काम सरकारने मार्गी लावावे.

- हर्षल चौधरी, शेतकरी.

Web Title: Only the announcement of Hami Bhav, the pastoral disappointment of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.