जळगावकरांची एकच हाक... गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:31+5:302021-09-21T04:18:31+5:30

जळगाव : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात जळगावकरांनी रविवारी गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या निर्बंधामुळे जळगावकरांनी ...

The only call of Jalgaonkars ... Ganpati Bappa Morya ... come early next year ...! | जळगावकरांची एकच हाक... गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...!

जळगावकरांची एकच हाक... गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...!

googlenewsNext

जळगाव : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात जळगावकरांनी रविवारी गणरायाला निरोप दिला. कोरोनाच्या निर्बंधामुळे जळगावकरांनी घरातील कुंडातच आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले तर मनपा व सामाजिक संस्थांच्या संकलन केंद्रांवर संकलित करण्यात आलेल्या बाप्पांच्या मूर्तीं मनपातर्फे विधिवत पूजन करून मेहरूण तलाव येथील गणेश घाट येथे विसर्जन करण्यात आल्या. सायंकाळी मेहरूण तलाव परिसरात गणेश भक्तांची प्रचंड गर्दी झालेली पहायला मिळाली.

दरवर्षी विसर्जन मिरवणुकांचा दणदणाट असतो. शिस्तबध्द पारंपरिक ढोल-ताशा पथकांपासून तरुणाईला डोलायला लावणाऱ्या डीजेपर्यंत सर्वकाही मिरवणुकांमध्ये दिसून येते. त्याचबरोबर मिरवणुका अनुभवण्यासाठी जिल्हाभरातून लोक शहरात येतात. त्यामुळे शहरातील मिरवणूक मार्ग भाविक आणि हौशी पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे बाप्पांसाठी असलेली भाविकांची वर्दळ गतवर्षी प्रमाणेच होती. राज्य शासनासह मनपा आणि जळगाव पोलिसांच्या आवाहनाला जळगावकरांनी प्रतिसाद दिला. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक न काढता अत्यंत साध्या पध्दतीने बाप्पाला निरोप दिला.

सकाळी ११.३० वाजता मनपाच्या मानाच्या गणपतीची महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याहस्ते आरती करण्यात आली होती.

मनपाच्या २८ केंद्रांवर मूर्ती संकलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश भक्तांना थेट मेहरूण तलाव येथे जाऊन विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे महानगरपालिकातर्फे शहरातील चारही प्रभागांमध्ये २८ गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारली होती. त्यासोबत काव्यरत्नावली चौक, डी मार्ट तसेच शिरसोली रस्ता येथेही युवाशक्ती, नेवे समाज तसेच रोटरीच्यावतीने संकलन केंद्र उभारण्यात आले होते़ या केंद्रांवर नागरिकांकडून मूर्ती संकलन करून त्या मूर्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने मेहरूण तलाव येथील गणेश घाटावर नेण्यात येत होत्या. नंतर बजरंग दलाच्या स्वयंसेवकांकडून मूर्ती तराफ्यावर ठेवून त्यांचे विधिवत पूजन करून विसर्जन केले जात होते.

मोठ्या मूर्तींसाठी क्रेनच्या वापर

मेहरूण तलाव परिसरातील सेंट टेरेसा स्कूलजवळ मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेश मूर्तींचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन केले जात होते. सायंकाळी ७ वाजेनंतर याठिकाणी घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी नागरिकांनी पोलिसांशी किरकोळ वाद घातला होता.

मनाई तरीही विसर्जन...

मेहरूण तलावात प्रत्यक्ष जाऊन विसर्जन करण्यास मनाई असताना काही नागरिकांकडून महाबळ येथून पर्यायी रस्ता शोधून मेहरूण येथे जाऊन विसर्जन सुरू होते. तसेच बांभोरी येथील गिरणा नदीपात्रातसुध्दा रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते.

येथेही झाले विसर्जन

सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती बाप्पांचे विसर्जन सुरू होते. त्याचबरोबर रामदेववाडी येथील तलावात देखील परिसरातील नागरिकांनी श्रीगणेश मूर्ती पूजन करून विसर्जन करण्यात आले.

Web Title: The only call of Jalgaonkars ... Ganpati Bappa Morya ... come early next year ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.