जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:25+5:302021-02-08T04:14:25+5:30
मनुष्यबळाचा अभाव : वैद्यकीय सेवेवर परिणाम, वर्षानुवर्षे पदे रिक्तच जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये पुरेसे मनुष्यबळ ...
मनुष्यबळाचा अभाव : वैद्यकीय सेवेवर परिणाम, वर्षानुवर्षे पदे रिक्तच
जळगाव : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने याचा आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. याचा वैद्यकीय सेवेवर परिणाम होत असून वर्षानुवर्षे कमी मनुष्यबळावरच आरोग्य यंत्रणेचा गाडा हाकला जात आहे. जिल्ह्यात आरेाग्य विभागातील डॉक्टर सोडून मंजूर पदांपैकी ५३२ पदे डिसेंबर २०२० अखेरपर्यंत रिक्त आहेत; तर आरोग्य केंद्रांमधील ३३ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत आरोग्यसेवक पुरुष, आरोग्य साहाय्यक पुरुष, आरोग्यसेविका, आरोग्य साहाय्यक महिला, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आयुविस्तार अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, आदी पदे मंजूर आहेत. यात सरळसेवा आणि पदोन्नतीने ही पदे भरायची आहेत. यासह अनेक महत्त्वाची पदेही रिक्त असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मध्यंतरी वेतनासंदर्भातील काम करायला कनिष्ठ साहाय्यक नसल्याने कर्मचाऱ्यांचे महिन्याचे पगार रखडत होते. त्यानंतर ग्रँडच्या अडचणीने पगाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. आहे त्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता.
आकडेवारी अशी
आरोग्य केंद्रांची संख्या
प्राथमिक आरोग्य केंद्र : ७७
उपकेंद्र : ४४२
आरोग्य केंद्र
एकूण कर्मचारी संख्या : ९०८
एकूण रिक्त कर्मचारी संख्या : ५३२
४४ वैद्यकीय अधिकारी
जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रांसाठी ४४ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे एक किंवा दोन आरोग्य केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासह आरोग्यसेवकांची १३२, आरोग्य साहाय्यकांची २१ आरोग्यसेविकांची ३१० ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यात आरोग्य साहाय्यक पुरुषांची २१ पदे ही पदोन्नतीने भरायची असून आरोग्यसेविकांची पदे सरळसेवा भरतीने भरायची आहेत.
कोट
जिल्ह्याच्या ७७ आरोग्य केंद्रात ४४ वैद्यकीय अधिकारी आहेत. आरोग्य उपकेंद्रांमध्येही लवकरच डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रिक्त पदांबाबत शासनाकडे अहवाल पाठविण्यात येत असतो. लवकरच ही पदे भरण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. समाधान वाघ, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी