नद्यांचे ‘काठ’वाचले, तरच नद्या जिवंत राहतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:55 PM2019-03-03T12:55:12+5:302019-03-03T12:55:26+5:30
-दिग्दर्शक संदीप सावंत
सचिन देव ।
जळगाव : नद्या शेजारी असणाऱ्या नागरिकांचे जीवन आजही नद्यावरच अवलंबून आहे. मात्र कालांतराने नवीन वसाहती किंवा शहरांच्या विकासासाठी नद्यांमध्ये अतिक्रमण केले जात आहे. नद्यांचे काठच शिल्लक राहिलेले नाहीत. यामुळे भविष्यात उद्भवणाºया गंभीर परिणामांना मानवालाच सामोरे जावे लागणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी नद्यांचे काठ वाचले पाहिजे, तरच नद्या जिवंत राहतील, असे मत ‘नदी वाहते’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.
शासनाने समाज प्रबोधन करणाºया चित्रपटांच्या निर्मितीसाठी अनुदान देण्याची अपेक्षाही सावंत यांनी यावेळी व्यक्त केली. जळगावात समर्पण संस्था, आयोजित पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाला १ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आॅस्कर पुरस्काराने गौरविलेल्या ‘श्वास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत जळगावी आले असता, ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न : मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत, हा बदल कशामुळे घडला.
उत्तर : हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळे बदल व संशोधन घडत आहे. विशेष म्हणजे माझ्या ‘श्वास’ या चित्रपटाला आॅस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हा बदल झाला.
दिग्दर्शकांतर्फे प्रेक्षकांच्या अभिरुचीला उतरतील असे चित्रपट येत असल्यामुळे, सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत.
प्रश्न : ‘श्वास’ चित्रपटाचे कथानक कसे सुचले.
उत्तर : पुण्याच्या माधवी घारपुरे यांनी लिहलेली १० त १२ पुस्तके मला वाचायला दिली होती. त्यातील एका पुस्तकामध्ये माधवी घारपुरे यांनी सत्य घटनेवर आधारीत एका प्रसंगाची कथा लिहली आहे. ती कथा वाचल्यानंतर, डॉ.शैलेश पुणतांबेकर यांच्या रुग्णालयातील घडलेला तो प्रसंग होता. त्यांच्याकडुन सविस्तर माहिती घेऊन,‘श्वास ’ हा चित्रपट तयार केला.
प्रश्न : चित्रपटासाठी लागणारा खर्च पाहता, शासनाकडुन पुरेसे अनुदान मिळते का.
उत्तर : शासनाने अलीकडेच मराठी चित्रपटांच्या अनुदानात वाढ केली आहे. ३० ते ४० लाखांपर्यंत अनुदान मिळते.
विशेष म्हणजे त्या-त्या चित्रपटाच्या बजेटनुसार अनुदान मिळत असते. त्यामुळे शासनाचे अनुदान खर्च पाहता योग्य आहे. मात्र, शासनाने निव्वळ टाईमपास चित्रपटांना अनुदान देणे बंद करावे. जे चित्रपट खरोखर चांगले आहेत, समाजप्रबोधन करणारे आहेत, अशा चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.
प्रश्न : ‘नदी वाहते’ या चित्रपटात कुठल्याही नायिकेचे पात्र नाही, तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, याचे वैशिष्य काय.
उत्तर : या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे ती ‘अंती’ नावाची नदी. नदी बोलू तर शकत नाही, मात्र तिच्या खळखळत्या पात्रांचे दिसणारे दर्शन प्रेक्षकांशी संवाद साधत राहते. या नदी भोवतीचा सारी कथा फिरत असल्याने, हा चित्रपट खºया अर्थाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.