पहिल्या दिवशी केवळ दहा टक्केच उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:17 AM2021-02-16T04:17:57+5:302021-02-16T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या लॉकडाऊनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने १५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या लॉकडाऊनंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील २१७ महाविद्यायलये सुरू झाली, मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ पाच ते दहा टक्केच होती. अनेक ठिकाणी वर्ग सुरूच झाले नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. कोरोनाची काळजी म्हणून हळूहळू वर्ग सुरू होतील, असे काही प्राध्यापकांचे म्हणणे होते.
लोकमत प्रतिनिधीने शहरातील काही महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यात महाविद्यालयांमधील वातावरण हे नेहमीसारखे होते. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचीच उपस्थिती होती. यात त्यांच्याकडून पहिल्या दिवशी केवळ पत्र भरू घेण्यात आली. गेटवरच तपासणी केली जात होती. मंगळवारपासून नियमित महाविद्यालये सुरू होतील, असे त्यांना सांगण्यात आले होते. मु. जे. महाविद्यालयात राज्यशास्त्र, इंग्रजी अशा काही मोजक्या विषयांचे वर्ग झाले. मात्र, विज्ञानाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग सुरू राहतील, असे सांगण्यात आले होते.
प्रात्याक्षिकांना गर्दी
मु. जे. महाविद्यालयात विविध विषयांच्या प्रात्याक्षिकांना विद्यार्थ्यांची गर्दी होती. वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत होते. ऑनलाईन वर्ग मात्र नियमित सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
असे होते चित्र
नूतन मराठा महाविद्यालय : नियमितसारखे वातावरण होते. सकाळी काही विषयांचे वर्ग झाले. काही वर्गात विद्यार्थी होते. मात्र, प्राध्यापक आले नव्हते. अनेक विद्यार्थी संभ्रमात असल्याचे चित्र होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही कार्यक्रमानिमित्त थोडी गर्दी होती. मात्र, वर्ग सुरू नव्हते.
मु. जे. महाविद्यालय : विद्यार्थी नोंदणी आणि अन्य कार्यालयीन कामात व्यस्त होती. सकाळी राज्यशास्त्राचा एक वर्ग झाल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांची अत्यंत कमी उपस्थिती होती. ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने पहिल्या दिवशी ऑफलाईन वर्ग नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : हताच्या बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी कॅम्पसमध्ये होते. मंगळवारपासूनच वर्ग सुरू होणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आत जाताना सुरक्षारक्षक थर्मल गनने तापमान मोजत होते.
मास्क सर्वांनी केले होते परिधान
महाविद्यालये सुरू करताना अनेक नियम व निकष घालून देण्यात आले आहेत. त्यात मास्क प्रत्येकाला बंधनकारक होते. पाहणी केलेल्या विद्यार्थ्यांनी मास्क परिधान केले होते. प्राचार्यांना किंवा शिक्षकांना भेटण्यासाठी जाण्याआधी हात सॅनिटाईझ करूनच प्रवेश केला जात होता. एकत्रित गर्दी कुठेही नव्हती. त्यामुळे मोठ्या महाविद्यालयांमध्ये पहिल्या दिवशी नियमांचे पालन होत असल्याचे चित्र होते. वर्ग सुरू नसल्याने कोरोनाबाबत प्रबोधन झाले किंवा नाही, याबाबत संभ्रम होता.
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालय : २१७
सुरू झालेली महाविद्यालये : २१७
पहिल्या दिवशी उपस्थिती : ५ ते १० टक्के
पहिला दिवस कसा गेला
पहिल्या दिवशी अगदी कमी प्रमाणात विद्यार्थी होते. आमचे वर्ग सकाळी सुरू झाले. पहिला दिवस असल्याने आम्ही उत्साहात आलो होतो, मात्र, या ठिकाणी तसे जाणवले नाही. पहिला दिवस तसा संमिश्र गेला.
- आदर्श सुभाष पाटील, द्वितीय वर्ष बी. कॉम
अनेक महिन्यांनी महाविद्यालय सुरू होणार असल्याने उत्साह होता. आमचे प्रथम वर्ष असल्याने सुरुवात ऑनलाईनने करावी लागली. पहिल्या दिवसाचे वेगळे वातावरण होते. मात्र, आज वर्ग सुरू झाले नाहीत. आम्हाला मंगळवापासून बोलावले आहे.
- यश विजय जोगी, प्रथम वर्ष, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती होती. प्रात्याक्षिके नियमित सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम नको म्हणून ऑनलाईन वर्ग सुरूच आहेत. अद्याप वसतिगृहांबाबत सूचना नसल्याने ऑफलाईन वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांपर्यंत तसे संदेश आम्ही ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून पोहोचवले आहेत.
प्रा. डॉ. संजय भारंबे, प्राचार्य मु. जे. महाविद्यालय