... तरच भाजपासोबत जाण्याचा विचार करेल, अबू आझमी यांचा दावा
By अमित महाबळ | Published: March 7, 2024 02:31 PM2024-03-07T14:31:12+5:302024-03-07T14:31:22+5:30
भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे.
जळगाव : भाजपाने त्यांच्यासोबत येण्याचे एकदा नव्हे दोनदा मला आमंत्रण दिले मात्र, ते जेव्हा आमच्या अटी-शर्ती मान्य करतील तेव्हाच त्यांच्या सोबत जाण्याचा विचार करता येईल, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार आबू आझमी यांनी गुरुवारी (दि.७) जळगावच्या अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
भाजपाकडून कधी सोबत येण्याविषयी आमंत्रण आले नाही का ? यावरील प्रश्नावर बोलताना अबू आझमी म्हणाले, की एकदा नव्हे दोनदा बोलावणे आले आले आहे. मात्र, त्यांनी सर्वात आधी महात्मा गांधींबद्दल चुकीचे बोलणे, त्यांच्या खुन्याचे कौतुक करणे बंद करावे. त्यांच्या सरकारमध्ये एकही मंत्री मुस्लिम नाही, मुस्लिमांनाही त्यांचा हिस्सा मिळायला हवा. त्यांनाही आपला परिवार म्हणून माना. या अटी-शर्ती मानल्या तरच सोबत जाण्याचा प्रस्तावावर विचार केला जाईल, असेही आझमी म्हणाले.
पक्षाच्या वतीने संविधान बचाव, देश बचाव मोहीम राबविली जात आहे. त्याची शेवटची सभा गुरुवारी जामनेरला होती. याशिवाय पक्षाच्या कार्यालयाचे व शाखांचे उद्घाटन आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आदींचेही आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आझमी हे जळगावला आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देशातील सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. जुलै २०२३ पासून ३ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. दुसरीकडे कॉर्पोरट कंपन्यांना १४ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. हा पैसा शेतकऱ्यांना दिला असता, तर त्यांची स्थिती सुधारली असती पण सरकार लक्ष देत नाही. देशात प्रत्येक तासाला महिलांबाबत ५ तर लहान मुलांबाबत २ गुन्हे घडतात. सरकार हेट स्पीचचे प्रकार रोखू शकलेले नाही, असेही आझमी म्हणाले.
१८ व्या वर्षी सरकार निवडतात मग लग्न का नाही?
देशातील १८ वर्षे पूर्ण मुले, मुली मतदानाद्वारे आपले सरकार निवडून आणतात. मग त्यांना लग्नाचा अधिकार का नसावा ? त्यासाठी २१ वर्षे वयाची अट कशासाठी हवी ? यातून उद्भवलेली लिव्ह इनची समस्या संपायला हवी असाही मुद्दा आझमी यांनी मांडला.