याठिकाणी भरली जाते पुरुषांची ओटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:05 PM2018-04-30T17:05:14+5:302018-04-30T17:05:14+5:30
सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त अमळनेरात मोफत रोग निदान शिबिर, शिधा वाटप, अन्नपूर्णा पूजा
आॅनलाईन लोकमत
अमळनेर,दि.३० - संत सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त २९ रोजी प्रसाद महाराजांनी १५०० महिला पुरुषांची ओटी भरण्यात आली. तर सेवेकऱ्यांना शिधा वाटप करण्यात येऊन सर्व रोग तपासणी शिबिर घेत गरजूंना मोफत औषधी वाटप करण्यात आले
पुरुषांची ही ओटी भरली जाते
सर्वसाधारणपणे ओटी महिलांची भरली जाते. मात्र सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त पुरुष, महिला अथवा जोडीने ओटी भरली जाते. २९ रोजी सुमारे १५०० लोकांची प्रसाद महाराज यांच्या हस्ते ओटी भरण्यात आली. ब्लाउज पीस व तांदूळ ओटीत टाकला जातो. पुरुषांना खडी साखर दिली जाते. ओटीसाठी ४ क्विंटल तांदूळ लागला. ओटी भरली गेली तर महिलेचे सौभाग्य वाढते अशी श्रद्धा आहे.
गाडीभर भात करीत केली अन्नपूर्णा पूजा
रात्री अन्नपूर्णा देवतेची पूजा करण्यात आली. सुमारे गाडीभर भात करून त्यावर अन्नपूर्णा देवतेचे दिवे तसेच भरड्याचे वडे ठेवून पूजा केली जाते. त्यानंतर तो भात नाभिक समाजाला देण्याची प्रथा आहे. तर वडे लोक प्रसाद म्हणून घरी नेऊन धान्यात ठेवतात. वडे धान्यात ठेवल्यास कधीच अन्न धान्य अपूर्ण पडत नाही अशी श्रद्धा आहे. सखाराम महाराज पुण्यतिथीची द्विशताब्दी असल्याने पुणे येथे २६ मे रोजी विष्णुयाग यज्ञ करण्यात येणार आहे. तर २ जून रोजी औरंगाबाद येथे ११ हजार लोक दासबोध पारायण करणार आहेत. तसेच पुढील वर्षी बोरी नदी पात्रात १०० कुंडी यज्ञ करण्यात येणार आहे.
लोटांगण चक्री भजन
सकाळी ९ ते ११ या दरम्यान पूजा पराग यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. हभप भगवानबुवा सडगावकर, बेलापूरकर महाराज, प्रकाशबुवा , त्र्यंबकबुवा शेजवळकर, रुपचंद महाराज यांचे कीर्तन झाले. तर पारणे जि.जालना येथील गोविंद भगवानराव लोंटांगणे यांचे देवासमोर लोटांगण घालत दीड तास चक्री भजन झाले
सर्व धर्मियांना शिधा वाटप
वर्षभर वाडी संस्थांची व सखाराम महाराजांची यात्रेत व इतरवेळी सेवा करणाºया सुतार , लोहार, चर्मकार, पाटील, ब्राम्हण, खाटीक, कसाई, मातंग, फकीर, परीट, नाभिक, भिक्षुक अशा सर्व समाजाच्या लोकांना संस्थांतर्फे महाराजांनी तेल, मीठ, हळद, गहू तांदूळ, पीठ शिधा वाटप करण्यात आले.