‘उघडा हो द्वार आता गणपती बाप्पा’, भाविकांची आराधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:49+5:302021-06-27T04:12:49+5:30
एरंडोल : खान्देशातील सांस्कृतिक ठेवा असलेल्या डोंगरमाथ्यावरील श्रीक्षेत्र पद्मालय या परिसरात जवळपास २ ते २.५ महिन्यांपासून शुकशुकाट जाणवत ...
एरंडोल : खान्देशातील सांस्कृतिक ठेवा असलेल्या डोंगरमाथ्यावरील श्रीक्षेत्र पद्मालय या परिसरात जवळपास २ ते २.५ महिन्यांपासून शुकशुकाट जाणवत आहे. पद्मालय येथील गणपती मंदिर कोरोना महामारीच्या टाळेबंदीमुळे व जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेल्या कडक निर्बंधांमुळे बंद ठेवण्यात आले आहे.
गर्दी टाळण्यासाठी व गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, आता गणपती दर्शनासाठी आसुसलेले भाविक ‘गणपती बाप्पा उघडा हो मंदिराचे दार’, अशी आराधना करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये अजूनही विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही. जवळपास दीड वर्षांपासून 'शाळा बंद-परीक्षा नाही, तरी विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात जाण्यासाठी पात्र ठरले आहेत. ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असून, विद्यार्थ्यांसाठी मात्र अद्यापही शाळेचा दरवाजा बंद आहे. तसेच पद्मालय येथील देवालयाचे द्वार अजूनही खुले झालेले नाही.
कोरोना काळात ‘शाळा व विद्यार्थी’ यात दुरावा निर्माण झाला आहे. असाच काहीसा प्रकार गणरायाचे भक्तगण व पद्मालयाच्या गणपतीबाबत दिसू लागला आहे.
गणपती दर्शनासाठी आतुर झालेले भक्तगण पद्मालयाचे देवालय लवकर खुले करावे व गणेशदर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी थेट गणपती बाप्पालाच साकडे घालत आहेत.