फेकरी येेथे उघड्या गटारींनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:24+5:302021-05-28T04:13:24+5:30
दीपनगर, ता. भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात शासनासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचा स्वच्छतेवर भर आहे, मात्र भुसावळ तालुक्यातील फेकरी ...
दीपनगर, ता. भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात शासनासह सर्व प्रशासकीय यंत्रणेचा स्वच्छतेवर भर आहे, मात्र भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील बऱ्याच वार्डात घाणीचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असून काही ठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शौचालयाची दुरवस्था
गावातील कोळी नगर, चाळीस बंगला व फेकरी गाड रस्त्यावर दुकानासमोरील जि. प. शाळेसमोर, बसस्टँड समोर बांधण्यात आलेल्या शौचालयाची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. एकाही शौचालयांना वीज , दरवाजे नाही. दुर्गंधी येत असल्याने नागरिक शौचालयाचा वापर करत नाही. रात्री, पहाटेच उघड्या जागेचा व जि. प. शाळेच्या परिसराचा वापर करतात. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. फेकरी गावातील रस्ते आजही घाणीने माखलेले असतात.
उघड्या गटारींमुळे अपघाताचा धोका
वार्ड क्रमांक तीन मध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु पाईप टाकण्याचे काम अपूर्ण ठेवल्याने सांडपाण्याच्या दुर्गंधीने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रात्रीच्या वेळेस लहान मुले या ठिकाणी खेळत असतात. यामुळे काही दुर्घटना घडली याला जबाबदार कोण असेल, असा सवाल देखील ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला केला आहे.
सांडपाण्याची विल्हेवाट लावा
रेल्वे पुलाखाली भरपूर सांडपाण्याचा साठा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून साचला आहे. त्याची देखील अद्यापही ग्रामपंचायतीने विल्हेवाट लावली नाही. यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे.
गावातील काही वार्डामध्ये नाल्या नसल्यामुळे सांडपाणी लोकांच्या घर अंगणात जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. याबाबत संस्कृती नगर येथील नागरिकांनी लेखी स्वरूपात अर्ज ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार यांना देऊन देखील अद्यापही दखल घेतली नाही, असा आरोप आहे.