कृउबामध्ये कोरोनाला खुलेआम निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:21+5:302021-02-24T04:17:21+5:30
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : बाजार समिती प्रशासन, संचालक मंडळ केवळ नावालाच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह शहरात ...
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : बाजार समिती प्रशासन, संचालक मंडळ केवळ नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून, दररोज दीडशेपार कोरोनाचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. शहरातील परिस्थिती ‘बद से बत्तर’ होत जात असताना, नागरिक अजूनही कोरोनाच्या समस्येला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पहाटेच्या वेळी भरणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. विशेष म्हणजे या गर्दीत प्रशासनाने आखून दिलेल्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसून, सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश फज्जा उडविला जात आहे. त्यामुळे कोरोनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद केला होता. केवळ घाऊक व्यापाऱ्यांनाच बाजार समितीच्या आवारात प्रवेश देण्याचा आदेश काढला होता. मात्र, मंगळवारी बाजार समितीत झालेल्या गर्दीवरून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला व्यापारी, विक्रेते व बाजार समिती प्रशासनाने एकप्रकारे केराची टोपलीच दाखविली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही तर शेतकरी आणि ग्राहकांनादेखील सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याने कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे.
जिल्हाभरातून येतात शेतकरी, व्यापारी
१. जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असल्याने जळगाव बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. धक्कादायक बाब म्हणजे, हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेरदेखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह मनपा व बाजार समिती प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते.
बाजार आहे तेथे गर्दी होणारच, बाजार समितीची भूमिका
फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. बाजार समिती असल्याने त्या ठिकाणी गर्दी होणारच असे धक्कादायक आणि बेजबाबदार उत्तर बाजार समितीकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाला कोरोनाच्या वाढत जाणाऱ्या प्रादुर्भावाबाबत गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारपासून बाजार समितीत मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा सूचना दिल्याची माहिती सभापती कैलास चौधरी यांनी दिली आहे.
उपाययोजनांसाठीची समिती झाली गायब
मध्यंतरी, बाजार समिती प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन अशा उपाययोजनांसाठी ५ सदस्यीय समिती गठित केली होती. पण ही समिती आता गायब झाली आहे. बाजारात येणारे व्यापारी, आडते, शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था केल्याचा बाजार समिती प्रशासनाचा दावा आहे. पण ते कुठेही नजरेस पडत नाही. गर्दी टाळण्यासाठी नोंदणीकृत व्यापारी, आडते यांना सुरुवातीला ओळखपत्रे देण्यात आली; पण कुणाच्याही गाळ्यत ते दिसून आले नाही.