‘आॅपरेशन अजगर’ फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:55 PM2019-12-16T12:55:46+5:302019-12-16T12:56:11+5:30
पाच तासांचे प्रयत्न फळाला : विहीरीत पडलेल्या अजगराला वन्यजीव संरक्षण संस्थेचे जीवदान
जळगाव : शहरातील बीबा नगर भागातील विहीरीत पडलेल्या ८ फुट अजगराला वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी ५ तास जिकरीची मेहनत करून जीवदान दिले. जीवदान दिलेला अजगर काही प्रमाणात जखमी असल्याने शहरातील महाबळ भागातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बीबा नगर भागात रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना सकाळी ९.१५ वाजता बीबा नगरातील विजय साळूंखे यांना विहीरीच्या एका कपारीत अजगर आढळून आला. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या रविंद्र सोनवणे यांना याबाबतची माहिती दिली. अर्ध्यातासातच वन्यजीव संस्थेचे सदस्य व सर्पमित्र आपल्या रेस्क्यू कीटसह घटनास्थळी दाखल झाले व अजगराला जीवदान देण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.
बचावाचे तीन प्रयत्न झाले अयशस्वी
१०.३० वाजेच्या सुमारास दोन सहकाऱ्यांनी विहीरीत दोरीच्या सहाय्याने उतरून अजगराला विहीरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजगराची लांबी व वजन देखील जास्त असल्याने अजगराला विहीरीतून काढणे कठीण होत होते. दोन वेळा विहीरीत उतरून देखील अजगराला बाहेर काढण्यास यश आले नाही. त्यानंतर खाटेला दोरीच्या सहाय्याने बांधून त्यावर दोन सहकारी बसून विहीरीत उतरले. मात्र, विहीरीत पाणी असल्याने अजगराला काढणे कठीण होत असल्याने मोहिम लांबत गेली.
कपारीतून अजगराला काढणे होते कठीण
दोन सहकारी विहीरीत उतरून देखील अजगराला काढणे अशक्य होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शीडी आणण्यात आली, शीडीव्दारे अजून दोन सहकारी विहीरीत उतरले.
अजगर विहीरीतील एका कपारीत बसून राहिल्याने अजगराला काढण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. तसेच विहीरीत अजून काही सर्प असल्यानेही मोहीमेला लांबत गेली.
सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरु झालेली मोहीम दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालली. मोठी जिकरीने दुपारी ३.३० वाजता सर्पमित्रांनी अजगराला वाचविण्यात यश आले. अजगराला काही प्रमाणात जखमा झाल्यामुळे तत्काळ अजगराला पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्र वासुदेव वाढे यांनी दिली.
अपघाताने अजगर विहरीत पडला
बिबा नगरचा हा भाग अजगर किंवा सर्पांसाठी नैसर्गिक अधिवास आहे. हा अजगर अपघाताने विहीरीत पडला असल्याची शंका सर्पमित्रांकडून व्यक्त करण्यात आली. ८ फुट असलेला हा अजगर इंडियन रॉक पायथन ( भारतीय पहाडी अजगर) या प्रकारातील बिनविषारी सर्प आहे. या मोहीमेत वासुदेव वाढे, रविंद्र सोनवणे, योगेश गालफाडे, निलेश ढाके, शितल शिरसाठ, बाळकृष्ण देवरे, महापालिका अग्निशमन दलाचे शशिकांत बारी , अश्वजित घरडे , प्रकाश चव्हाण , देविदास सुरवाडे , वसंत पाटील, विलास कुमावत, विजय चौधरी, किशोर महाजन यांनी विशेष प्रयत्न केले.