अफूची लागवड अंमलीपदार्थ की खसखससाठी?, हजार गोण्यांची किंमत १० कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:55 AM2022-03-07T10:55:18+5:302022-03-07T10:58:17+5:30
Jalgoan : अफूच्या शेतीवर निर्बंध असल्याने प्रकाश सुधाकर पाटील (वय ४०,रा.वाळकी, ता.चोपडा) या शेतकऱ्याने नेमक्या कोणत्या उद्देशासाठी लागवड केली याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
जळगाव : चोपडा तालुक्यातील घोडगाव शिवारात पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अफूची शेती उद्ध्वस्त केली. जिल्ह्यात प्रथमच अफूची लागवड झाल्याचे या घटनेतून समोर आले. अफूचा वापर हा हेरॉईन या अंमली पदार्थ व खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. अफूच्या शेतीवर निर्बंध असल्याने प्रकाश सुधाकर पाटील (वय ४०,रा.वाळकी, ता.चोपडा) या शेतकऱ्याने नेमक्या कोणत्या उद्देशासाठी लागवड केली याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
मजूर व पोलीस मिळून हे पीक काढण्यात आले असून त्याला तीन दिवस लागले. त्यातून हजारापेक्षा जास्त गोण्या भरण्यात आल्या आहेत. रविवारी सायंकाळी ही मोहीम पूर्ण झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी ‘लोकमत’ ला दिली. खसखस तयार करण्यासाठी आपण अफूची लागवड केली होती असे प्रकाश याने पोलिसांना सांगितले असले तरी रात्रीच्यावेळी शेती बघायला अलिशान कार येत होत्या, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.
काय आहे नेमकं अफू?
१) अफू हे तीन महिन्यांचे पीक आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर मध्ये ही लागवड केली जाते. कांद्याच्या बियाण्यात मिसळून अफूचे बी जमिनीवर फेकले जाते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात या पिकाला फुले येतात. फुले गळून पडल्यानंतर त्यापासून बोंड तयार होते. या हिरव्या दिसणाऱ्या बोंडाला चिरा मारून त्यातून द्रव्य पदार्थ एकत्र केला जातो. याच द्रव्य पदार्थापासून अफू आणि चरस तयार केला जातो. त्यामुळे या अफूचा वापर बोंडापासून हेरॉइन, चरस आणि गांजा बनवण्यासाठीच केला जातो.
२) अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो. अफू ही पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम असे आहे. अफू हे ६० ते १२० सेंमी. उंची असणारं झुडूप आहे. याची पानं साधी, कमी जास्त करवती काठाची, तळाशी खोडास वेढून राहणारी असतात. बिया लहान, पांढऱ्या व विपूल असून त्यांनाच खसखस म्हणतात.
३) जगात अफूचे सर्वाधिक उत्पादन अफगाणिस्तानामध्ये होते. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते. अफूचे शुध्दीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात.
आतापर्यंतच्या चौकशीत संबंधित शेतकऱ्याने तीन महिने किरकोळ स्वरुपात बी गोळा केले व डिसेंबरमध्ये त्याची लागवड केली. अफूचा वापर अंमली पदार्थ व खसखस या दोघांसाठी होतो. त्याने प्रथमच ही लागवड केली आहे. काही बाबी तपासाचा भाग आहे. या प्रकरणात सर्व कंगोरे तपासले जात आहेत.
- प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक