वाळूचा लाडू फोडण्यासाठी विरोधकांचे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:57+5:302021-01-23T04:16:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाले. जळगाव शहरालगत असलेल्या वाळू गटांना जास्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांचे लिलाव झाले. जळगाव शहरालगत असलेल्या वाळू गटांना जास्त पसंती मिळाली आहे. त्यात शहरातील अनेक दिग्गज व्यावसायिक आणि एकमेकांच्या विरोधी राजकीय पक्षात सक्रिय असलेले एकत्र आले आहेत.
८ वाळू गटांचीच बोली लागली. त्यातून शासनाला पावणेअकरा कोटींचा महसूल मिळाला. हे खरे असले तरी पद्मालय विश्रामगृहात झालेल्या बैठकीने वाळू गटांचे तिरके राजकारण सरळ झाले आहे. एकमेकांच्या विरोधात उघड भूमिका घेणारे अनेक दिग्गज या वाळू गटात एकत्र आले आहेत. त्यांनी एकमेकांच्या सहायाने कोण कोणता वाळू गट घेणार हे निश्चित केले. त्यातूनच वाळूचे राजकारण रंगले आहे.
यात एका सत्ताधारी राजकीय पक्षाचे महानगराध्यक्ष आणि विरोधी पक्षाचे वित्त पुरवठा करणारे आणि राजकीय व्यवस्थापक देखील एकत्र आले आहेत. त्यांनीच या बैठकीसाठी पुढाकार घेतला आणि सर्व काही मनाप्रमाणे करवून घेतल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच रंगली होती.
या वाळू गटांना प्रतिसाद नाही
जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळालेला नाही.
सर्वांत मोठा गटच राहिला लिलावाविना
जळगाव तालुक्यातील भोकर हा वाळू गट सर्वांत मोठा मानला जातो. त्यानुसार त्याची ऑफसेट किंमतदेखील जास्तच होती. मात्र, या गटासाठी कोणीही बोली लावली नाही.
कुणी घेतला कोणता गट
बांभोरी - पटेल ट्रेडिंग, घाडवेल (ता. चोपडा) - नीलेश पाटील, आव्हाणी (ता. धरणगाव)- स्टार बालाजी ऑनलाइन लॉटरी, नारणे - सुनंदाई बिल्डर्स, वैजनाथ - श्री श्री इन्फ्रा, टाकरखेडा व्ही. के. एन्टरप्रायजेस, उत्राण १ - एम. एस. बिल्डर्स, उत्राण २ - महेश माळी.