सोनीनगरातील जागेवर रुग्णालय बांधण्याला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:31+5:302021-05-30T04:14:31+5:30
उपमहापौरांचा हट्ट का : रहिवाशांनी घेतली महापौरांची भेट जळगाव : पिंप्राळा शिवारातील सोनीनगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्याबाबत ...
उपमहापौरांचा हट्ट का : रहिवाशांनी घेतली महापौरांची भेट
जळगाव : पिंप्राळा शिवारातील सोनीनगरातील खुल्या जागेवर रुग्णालय बांधण्याबाबत शिवसेनेने महासभेत ठराव केला आहे. मात्र, रुग्णालय बांधणीला येथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून, याच जागेवर रुग्णालय बांधण्याचा उपमहापौरांचा हट्ट का, असा प्रश्न उपस्थित करीत, रहिवाशांनी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेऊन हे रुग्णालय इतर जागेवर बांधण्याची मागणी केली आहे.
सावखेडा रस्त्यावरून सोनीनगरातील गट क्र. २७७/२ ची खुली जागा ही स्थानिक रहिवाशांसाठी सार्वजनिक कार्यक्रम करण्याकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी या जागेवर रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. जर या जागेवर रुग्णालय बांधले, तर नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम कुठे करायचे, असा प्रश्न या नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
पिंप्राळा परिसरातील वैकुंठधामसमोरील संत मीराबाईनगर परिसरातही आरक्षित जागा आहे. तसेच हुडको परिसरातही मनपाची तीन एकर जागा पडून आहे. असे असताना या जागांवर रुग्णालय न बांधता कुलभूषण पाटील यांच्या सोनीनगरातील जागेवर रुग्णालय बांधण्याच्या निर्णयावर रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत ज्ञानेश्वर ताडे, नरेश बागडे, नीलेश जोशी, जे. एस. शिंपी, सोपान पाटील, सोनू शर्मा, लाभेश पाटील, दीपक पाटील, अजय पाटील यांनी शनिवारी जयश्री महाजन यांची भेट घेऊन हे रुग्णालय मनपाच्या इतर जागेवर बांधण्याची मागणी केली. दरम्यान, येथील रहिवाशांनी आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत व आयुक्त सतीश कुलकर्णी यांनाही निवेदन दिले आहे.