दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:00 IST2025-04-24T12:00:20+5:302025-04-24T12:00:52+5:30
हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.

दोन बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी विरोधकांकडून विघ्न; ठाकरेंच्या शिवसेना नेत्याचा आरोप
Shiv Sena UBT: "महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येणे गरजेचे असल्याची भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे. हे दोन्ही नेते एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाची शक्ती वाढेल ही भीती विरोधकांना सतावत आहे. त्यामुळे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नयेत यासाठी विरोधकांकडून विघ्न निर्माण केले जात आहे," असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी केला आहे.
सुभाष देसाई हे बुधवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता अजिंठा विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी उद्धवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्ह्यात पक्षाची स्थिती आणि इतर मुद्यांची त्यांनी यावेळी माहिती घेतली.
संघर्ष मोठा आहे, लढा आणि जिंकण्याचा संदेश
शिवसेनेत फुटीनंतर काही नेते शिंदेसेनेत गेले आहेत. मात्र, आपल्याकडे शिवसैनिकांची ताकद आहे. त्यामुळे विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव विसरून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे देसाई यांनी सांगितले. आगामी काळात पक्षासाठी संघर्ष मोठा आहे. मात्र, या संघर्षावर मात करून पक्ष संघटनेच्या जोरावर पुन्हा पक्षाला चांगले दिवस आणायचे आवाहन देसाई यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जयश्री महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, या बैठकीत संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, लक्ष्मण पाटील, महानंदा पाटील, विराज कावडिया यांच्यासह उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत देसाई यांनी आढावा घेतला.