विरोधी पक्षनेते व शिवसेना महानगरप्रमुख यांनी भरला प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:23+5:302021-03-20T04:15:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडी दरम्यान शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडी दरम्यान शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन व महानगरप्रमुख शरद तायडे यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे व मास्क न लावल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. मात्र शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी स्वतः सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे व मास्क न लावणे याबाबत महापालिकेने निर्धारित केलेल्या दंडाच्या रकमेनुसार प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड महापालिकेकडे भरला आहे. यासह मास्क न लावण्याबाबत देखील ५०० रुपयांचा दंडही ही दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी भरला.
महानगरपालिकेची महापौरपदाची निवडणूक झाल्यावर पक्षातर्फे महानगरपालिकेच्या प्रांगणात विजयाचा जल्लोष करण्यात आला. मात्र जल्लोष करीत असताना विरोधी पक्षनेता सुनील महाजन आणि शिवसेना शहर महानगराध्यक्ष शरद तायडे यांचेकडून अनवधानाने मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. त्याबाबत त्यांनी त्वरित महानगरपालिकेचा दंड म्हणून प्रत्येकी ५ हजार भरून सामाजिक जबाबदारीचे भानही जपले. या कोरोनाच्या कठीण काळात सर्वानी जबाबदारीने मास्क घालूनच नित्यकामे करावी, असेही सुनील महाजन तसेच शरद तायडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे.
कुणीही असो कायदा सर्वांना समान आहे. तसेच मास्क लावलेला नसल्यास या पद्धतीनेच प्रत्येकावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.