विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार नुकसानग्रस्त भागांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:15+5:302021-05-31T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यात येत आहे. यामध्ये १ जून रोजी ते रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे ३१ मे रोजी रात्री जामनेर येथे आगमन होणार असून तेथे ते मुक्काम करणार असल्याची माहिती मिळाली. मात्र या विषयी पक्षाच्यावतीने दुजोरा देण्यात आलेला नाही. गुरुवार, २७ मे रोजी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी फडणवीस हे १ जून रोजी या दोन्ही तालुक्यांना भेट देणार आहे. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, नंदू महाजन व या भागातील लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकारी हे सोबत राहणार आहे.
आज जामनेरला मुक्काम?
देवेंद्र फडवणीस हे १ जून रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असून त्यासाठी त्यांचे ३१ मे रोजी रात्री जामनेर येथे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. ३१ रोजी औरंगाबाद, जालना येथील दौरा आटपून ते वाहनाने जामनेरला येणार असल्याची माहिती मिळाली. तेथून ते १ जून रोजी सकाळी रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात जाणार आहे. त्यांच्या आगमनाची व १ जून रोजीच्या दौऱ्याची वेळ अद्याप निश्चित नसून सोमवारी अधिकृत दौरा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.