प्रेम विवाहाला विरोध, आई-वडिलांनीच केली मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 06:42 PM2021-04-10T18:42:51+5:302021-04-10T18:43:23+5:30
मनाविरूध्द प्रेम विवाह केला म्हणून त्याचा गळा घोटून खून केल्याप्रकरणी आई वडिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : मुलाने कुटुंबाच्या मनाविरूध्द प्रेम विवाह केला म्हणून त्याचा गळा घोटून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधीत दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आई-वडीलांचा विरोध असताना प्रेमप्रकरणातून लग्न केल्याचे कारणावरून चक्क आई-वडीलांनी आपल्या पोटच्या पोराचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना शहरातील कैलास नगर भागात घडली होती. याबाबत शहर पोलिस ठाण्यात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, निलेश प्रताप कुमावत (कैलास नगर, भुषण मंगल कार्यालय, चाळीसगाव) याने विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (३५, सदिच्छा नगर, जि. धुळे) हिच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र त्याच्या विवाहाला घरून विरोध होता. त्याची आई अलका प्रताप कुमावत (५६) व वडील प्रताप सहादु कुमावत (६४) त्यांच्या प्रेम विवाहास स्पष्ट विरोध होता. यामुळे या कुटुंबात आधी देखील अनेकदा खटके उडाले होते. यातच १३ मार्च २०२० रोजी निलेश प्रताप कुमावत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. निलेशच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम न करता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या प्रकरणी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (३५, सदिच्छा नगर, धुळे ) यांनी चाळीसगाव न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाचे याची दखल घेत कलम-१५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. चाळीसगाव शहर पोलीसात सी.आर.पी.सी कलम १५६ (३) च्या आदेशानुसार शहर पोलिस ठाण्यात ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलाच्या खून प्रकरणी आई-वडिलांच्या विरूध्दच गुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.