सेनेच्या प्रभागात उपमहापौरांचे मनपाविरोधी पक्षनेत्यांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:09+5:302020-12-15T04:32:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे उपमहापौर सुनील खडके यांच्या उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमाला सत्ताधारी भाजपचे आमदार व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एकीकडे उपमहापौर सुनील खडके यांच्या उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमाला सत्ताधारी भाजपचे आमदार व इतर नगरसेवकांकडून टाळले जात असताना, दुसरीकडे उपमहापौरांच्या उपक्रमाला शिवसेना नगरसेवकांकडून पाठिंबा दिला जात आहे. हा पाठिंब्यामागे जरी शिवसेनेची राजकीय खेळी असली तरी या खेळीतून सेनेने भाजपच्या गटबाजीला एकप्रकारे उत्तर दिले जात असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी प्रभाग क्रमांक १५ मध्ये उपमहापौर सुनील खडके यांचे स्वागत मनपाविरोधी पक्षनेते सुनील महाजन व नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे. गेल्या आठवड्यातही सेनेच्या गटनेत्यांनी खडके यांचे स्वागत करत, आमदार भोळे यांच्यावर टीका केली होती.
''उपमहापौर आपल्या दारी'' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग १५ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, जयश्री महाजन, मनोज आहुजा, चेतन सनकत, मीनाक्षी पाटील, भरत सपकाळे, मनोज काळे, अशोक लाडवंजारी, कुंदन काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते. प्रभाग १५ मध्ये दौऱ्याला सुरुवात करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके यांचे आगमन होताच नगरसेवक सुनील महाजन, प्रशांत नाईक यांनी पुष्पहार, गुच्छ देऊन स्वागत केले. उपमहापौर प्रभागात येताच फटाके फोडून आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत त्यांचे औक्षणदेखील करण्यात आले.
अमृतचे काम लवकर मार्गी लावावे
मेहरूण परिसरात अमृत योजनेच्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून, कामाला सुरुवात झाली आहे. उपमहापौर सुनील खडके यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देत काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे सांगितले. उपमहापौरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक आणि दीपमाला चौकाची पाहणी केली. मुख्य रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी रस्त्यांची वेळीच डागडुजी करावी, असेही उपमहापौरांनी सांगितले. यासह सार्वजनिक शौचालयांचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवकांनी दिली.