शिरसोलीत मृत्यूचे तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:10 AM2021-03-29T04:10:55+5:302021-03-29T04:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरसोली : रविवारी एकाच दिवशी येथे वेगवेगळ्या कारणांनी सहा जणांचा मृत्यू झाला असून यामुळे गावात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरसोली : रविवारी एकाच दिवशी येथे वेगवेगळ्या कारणांनी सहा जणांचा मृत्यू झाला असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने संपूर्ण गावात फवारणी करून तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शिरसोली प्र. बो. येथील नाना लक्ष्मण वाघ ( कोतवाल, ५०) यांचा जळगाव येथे शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला व त्यांच्यावर जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना असा परीवार आहे.
दुसऱ्या एका घटनेत जाकीर समसुद्दीन पिंजारी (५४) यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार भाऊ असा परिवार आहे.
तसेच शिरसोली प्र. बो. येथील सखाऊद्दीन मुजाहीद्दीन शेख (६३) यांनाही ह्रदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना घरी आणले असता घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिरसोली प्र. बो. येथील पाटील वाड्यातील मंडाबाई राजाराम पाटील (७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. इंदिरा नगर भागातील जयवंता पंडित भिल (६५) यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे.
शिरसोली प्र. नं. येथील द्वारकाबाई दशरथ खलसे (बारी) (७०) यांची जळगाव येथे डोळ्यांची शस्रक्रिया करण्यात आली होती. परंतु तेथेच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावरही जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शिरसोली येथे प्रथमच एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तपासणी मोहीम राबवा
शिरसोली येथे तापाची साथ सुरु असल्याने घरोघरी रुग्ण आढळून येत आहेत. गावातील रुग्णालयात गर्दी होत असून ग्रामपंचायतीने गावातील गटारी व परिसर स्वच्छ करुन सॅनेटाईजेशन करावे तर आरोग्य विभागाने ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार करावे, अशी मागणी होत आहे.