बीएचआर पतसंस्थेचे बँक खाते गोठविण्यासह जागा अटकावून ठेवण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:17 AM2021-05-19T04:17:16+5:302021-05-19T04:17:16+5:30
जळगाव : गुंतवणूकदारांची देणी थकल्यामुळे बीएचआर पतसंस्थेचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत असलेले बँक खाते गोठविण्यासह एमआयडीसीतील मुख्य ...
जळगाव : गुंतवणूकदारांची देणी थकल्यामुळे बीएचआर पतसंस्थेचे युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत असलेले बँक खाते गोठविण्यासह एमआयडीसीतील मुख्य कार्यालय दीड हजार चौरस फूट जागा अडकवून ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी मंगळवारी काढलेले आहेत.
प्रकाश मोतीलाल सरताळे व शैलेश प्रकाश सरताळे (रा.जामनेर) यांनी बीएचआर पतसंस्थेत काही रक्कम गुंतवली होती. संस्थेकडे ही रक्कम थकीत झाल्याने दोघांनी जिल्हा ग्राहक मंचकडे धाव घेतली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवीदारांच्या रकमा या जमीन महसुली थकबाकी म्हणून वसुलीस योग्य असल्याने आरआरसी प्रकरणातील थकीत रक्कम ३ लाख ३८ हजार ६७२ रुपये व १९ एप्रिल २०१९ पासून ९ टक्के व्याज देण्याबाबत कसूर केली आहे. त्यामुळे पतसंस्थेची मुख्य कार्यालयातील दीड हजार चौरस मीटर जागा अडकवून ठेवण्याचे अधिपत्र तहसीलदार नामदेव पाटील यांनी काढले आहे. जोपर्यंत ही रक्कम दिली जात नाही तोपर्यंत मुख्य कार्यालय सील ठेवले जाईल असेही त्यात नमूद केले आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी मेहरुण तलाठी व मंडळाधिकारी यांना आदेश दिले आहेत.
भुसावळ येथील ॲड. राजेश उपाध्याय यांनी आपले सरकार पोर्टलवर केलेल्या तक्रारीनुसार युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत असलेले खाते गोठवण्याचे आदेश तहसीलदाराने दिलेले आहेत.