आरोग्य विभागाच्या कंत्राटी भरतीच्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:05+5:302021-05-11T04:17:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडच्या काळात आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या काळात आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरतीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य समिती सभापती रवींद्र पाटील यांनी दिले आहेत. सोमवारी त्यांनी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेऊन आगामी ७ दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सभापतींच्या दालनात ही आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. जमादार, अपर जिल्हाधिकारी डॉ. पांढरे व मिलिंद लोणारी यांच्यासह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, कोविडच्या महामारीत मनुष्यबळाची समस्या सोडविण्यासाठी बऱ्याच पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली असून, याविषयीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत आल्या आहेत. याविषयी आलेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व तक्रारींची चौकशी करावी, असे सभापती पाटील यांनी अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. तसेच आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त होत असताना, त्यांची चौकशी का होत नाही, असे विचारत त्यांनी कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला. लसीकरणाबाबत व कोरोना चाचण्यांबाबतचा आढावाही पाटील यांनी यावेळी घेतला.