कोविशिल्ड लसीच्या वीस हजार डोसेसची ऑर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:43+5:302021-01-13T04:40:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना लसीकरणाच्या तयारीस सुरूवात झाली असून येत्या दोन दिवसात कोविशिल्ड लसीचे वीस हजार डोस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना लसीकरणाच्या तयारीस सुरूवात झाली असून येत्या दोन दिवसात कोविशिल्ड लसीचे वीस हजार डोस जिल्ह्याला प्राप्त होणार असून जिल्हा रुग्णालयात त्यांची साठवणूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत १३ केंद्रावरील ८९ कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रशिक्षणही मंगळवारी घेण्यात आले. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
पुणे येथून आधि आरोग्य सहसंचालकांकडून लसीचे हे डोस जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. बुधवारी रात्री किंवा गुरूवारी हे डोस उपलब्ध होऊ शकतात. अशी माहिती आहे. यासाठी १३ केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. शासनाकडून तेरा केंद्रांची यादी मागविण्यात आली होती. त्यात महापालिकेचे पाच केंद्र अपेक्षित होते. मात्र, लसीकरणाची व्यवस्था होईल, असे महापालिकेकडे दोनच केंद्र असल्याने अखेर ग्रामीण भागातील तीन केंद्र यात समाविष्ट करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सींगच्या इमारतीत हे केंद्र राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ, जयश्री वानखेडे यांनी या ८९ कर्मचाऱ्यांना कोविन ॲप आणि लसीकरणाबाबत प्रशिक्षण दिले.
अशी असेल लस
- लस ही पावड स्वरूपात प्राप्त होणार असून डिस्टील वॉटरमध्ये मिसळून ती दिली जाणार असल्याची माहिती आहे.
- प्रत्येक केंद्रावर दोन पोलीस कर्मचारी देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाने पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे.
- लस आल्यानंतर जिल्हा साठवणूक केंद्रात जिल्हा रुग्णालयात राहिल्यानंतर केंद्रांना पाठविण्यात येणार आहे.
- १६ पासून पुढील पंधरा दिवस ९ ते ९:३० वाजेपासून केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
- ड्रायरन प्रमाणेच सर्व व्यवस्था राहणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक दिवस आधीच रुग्णवाहिकांची व्यवस्था राहणार आहे, ऑक्सिजन बेड आणि आपात्कालीन किट राहणार आहे.
अशी आहे स्थिती
१९९११ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण
२० हजार डोसेसची ऑर्डर
एकूण ८९ कर्मचारी
प्रत्येक केंद्रावर असतील ६ कर्मचारी
त्या - त्या केंद्राच्या प्रमुखांकडे प्रमुख जबाबदारी