स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आयुध निर्माणी कटिबद्ध -राजीव पुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:59 PM2018-12-16T16:59:05+5:302018-12-16T17:00:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भुसावळ आयुध निर्माणी कटिबद्ध असल्याचे महाव्यवस्थापक राजीव पुरी यांनी सांगितले.
भुसावळ, जि.जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भुसावळ आयुध निर्माणी कटिबद्ध असल्याचे महाव्यवस्थापक राजीव पुरी यांनी सांगितले.
ते आयुध निर्माणीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अपर महाव्यवस्थापक सुधीर मलिक, संयुक्त महाव्यवस्थापक निलांद्री बिस्वास, कार्य व्यवस्थापक ए.के.देशमुख, सहाय्यक व्यवस्थापक दीनबंधू मीणा, कनिष्ठ कार्य व्यवस्थापक ए.के.सोनी, अनुवादक विवेक स्वामी, पर्यवेक्षक विक्रमसिंह, युनियन प्रतिनिधी सतीश शिंदे उपस्थित होते.
महाव्यवस्थापक राजीव पुरी पुढे म्हणाले की, भुसावळ आयुध निर्माणीत आपले लक्ष्य पूर्ण करून १ ते १५ डिसेंबरपर्यंत स्वच्छता पंधरवाडा राबविण्यात आला होता. यात आयुध निर्माणीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कपाटांमधील सर्व कागदपत्रे नीटनेटके ठेवणे, प्रशासकीय कार्यालय व कॉलन्यांमध्ये स्वच्छता, वृक्षारोपण, स्वच्छतेवर आधारीत चित्रकला व निबंध स्पर्धा, मिनी मॅरेथॉन, कीटकनाशकांची फवारणी, सार्वजनिक शौचालय व गटारींची सफाई, जनजागृती रॅली आदी करण्यात आले.
वसाहतीत स्वच्छता रहावी म्हणून घंटागाडी तैनात राहणार असून, आयुध निर्माणी कचरा डबा मुक्त करण्यात येणार आहे. विविध चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांना बक्षिसे वितरण करण्यात आली. कचऱ्यातून खतनिर्मितीचा प्रयत्न राहणार असून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, असे आवाहनही पुरी यांनी केले.