संस्थेने ‘पिले’ यांची नियुक्तीचं केली नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:17 AM2021-04-22T04:17:00+5:302021-04-22T04:17:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आर.आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदासाठी रमेश श्रावगी यांचा प्रस्ताव पाठविला असतानासुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संस्थेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आर.आर. विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदासाठी रमेश श्रावगी यांचा प्रस्ताव पाठविला असतानासुद्धा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संस्थेच्या कामात ढवळाढवळ करीत त्यांच्या मर्जीतील व्यक्ती उपशिक्षक संजय पिले यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार सोपविला असल्याचा आरोप करीत संस्थेने अशी कुठलीही नियुक्ती केलेली नसल्याची तक्रार ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद लाठी यांनी उपसंचालकांकडे केली आहे.
आर.आर. विद्यालयात संजय पिले हे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांची प्रभारी मुख्याध्यापक म्हणून ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीकडून नियुक्ती केली नसून तसा ठरावसुद्धा करण्यात आलेला नाही. दरम्यान, मुख्याध्यापक पदासाठी परेश श्रावगी यांचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असता, अद्याप त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याआधीदेखील झंवर यांच्याकडे परस्पर प्रभार देण्यात आला होता. सोबतच पिले यांना प्रशासकीय कामात ढवळाढवळ न करण्याचेही पत्र पाठविण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अनधिकृतपणे स्वाक्षरी केल्याचा आरोप
संजय पिले यांच्याकडे कुठलेही अधिकार नसताना त्यांनी प्रशासकीय तसेच आर्थिक कामकाजावर अनधिकृतपणे स्वाक्षऱ्या करून व त्यातून विद्यार्थी पालक व शाळेच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानास शिक्षणाधिकारी व पिले हे जबाबदार असतील, असेही अरविंद लाठी यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.