सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटना करताहेत नियोजनबद्ध, प्रभावी कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 03:02 PM2020-04-14T15:02:42+5:302020-04-14T15:04:40+5:30

हल्ली जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे.

Organized, effective work by various organizations through social media | सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटना करताहेत नियोजनबद्ध, प्रभावी कार्य

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटना करताहेत नियोजनबद्ध, प्रभावी कार्य

Next
ठळक मुद्देकोरोना इफेक्टविविध संघटना कमालीच्या अ‍ॅक्टीव्ह

डिगंबर महाले
अमळनेर, जि.जळगाव : हल्लीचे युग नेमके कशाचे आहे? कोणत्या फॅक्टरचा सर्वाधिक बोलबाला आहे, याबाबत समाजमनाची जाण असणाऱ्यांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र, हल्ली जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे. यावर सर्वांचेच मतैक्य आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक या सर्वच क्षेत्रात हल्ली सोशल मीडियाचा सर्रास वापर सुरू आहे. या सर्वच क्षेत्रात नियोजनापासून ते मार्केटिंगपर्यंत सोशल मीडियाला आता पर्याय राहिलेला नाही. किंबहुना जो सोशल मीडियाचा सढळ हाताने आणि चपखलरित्या जितका जास्तीत जास्त वापर करेल तितकी त्याची सरशी होईल, हीच वस्तुस्थिती आहे.

विद्यार्थी संघटना म्हटल्या म्हणजे सळसळते चैतन्य आणि नित्यनावीण्याच्या वलयात राहणाºया असतात. त्यांच्यात सोशल मीडियाचे स्थान प्राणवायूपेक्षा फारसे कमी नसते. सर्व प्रकारच्या चळवळी आणि उपक्रमांना सर्वदूर व्यापकतेने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचविण्यात यांचा हातखंडा आहे. त्यातही अ.भा.वि.प.सारख्या केडर बेस संघटनेचे तर विचारायलाच नको. प्रसंग आणि स्थिती कोणतीही असो तिला सोशल मीडियाच्या साहाय्याने कसे हाताळावे यात अभाविप अन्य संघटनांच्या तुलनेने निश्चित उजवी आहे. लॉकडाऊनच्या काळातही फेसबुकच्या माध्यमातून थेट लाईव्ह कार्यक्रमांपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत कार्यक्रम व उपक्रम ते लिलया राबवित आहेत.
फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग आदींच्या माध्यमातूनही कोरोनासारख्या स्थितीत संघटना कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. कोरोनाला संकट किंवा आक्रमण न मानता त्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान व संधीस्वरूप रूप देण्यात अभाविप चांगल्याप्रकारे यशस्वी झाली आहे. नवीन सदस्यांना जोडणे आणि त्यांना जुन्या सदस्यांसह बांधून ठेवणे यातही अभाविप यशस्वी ठरली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सदस्यांना दिलासा देणे, मार्गदर्शन करणे, मदत करणे, वंचित घटकांसाठी मदतीचे अनेकविध उपक्रम राबविणे, त्याचा पद्धतशीर डाटा मेंटेन करणे हे सारे काही सोशल मीडियाच्या साहाय्याने हाताळण्यात संघटना खूप यशस्वी ठरली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रूढी व परंपरा प्रिय असल्या तरी त्यांना संघटन मजबूत, सुनियोजित व सुनियंंित्रत करण्यासाठी सोशल मीडियासारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात कोणतेही वावडे नाही. मायक्रोप्लॅनिंग बेस असलेल्या संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी मदतकार्य करण्यासाठी सोशल मीडियाचा निपुणतेने वापर केला आहे व करत आहे. कोरोनामुळे संघाच्या शाखा व उन्हाळी प्रशिक्षण वर्गांना निर्बंध आले आहेत. त्यामुळे स्वयंसेवकातील विविधांगी बंध घट्ट करण्यासाठी संघ सोशल मीडियाचा पध्दतशीर वापर करीत आहे.
अंधश्रद्धा निर्र्मूलन समितीचे कामही व्यापक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचेही मोठे नेटवर्क आहे. समितीला सर्वार्थाने मोठी व सशक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेचे पेव फुटू नये तसेच त्यावर उपाययोजना स्वरूप कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी, मदतकार्य उभारण्यासाठी समिती सोशल मीडियाचा उत्तम वापर करीत आहे.

Web Title: Organized, effective work by various organizations through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.