‘युवारंग’च्या धर्तीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन
By admin | Published: February 8, 2017 01:01 AM2017-02-08T01:01:56+5:302017-02-08T01:01:56+5:30
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवारंग महोत्सव घेण्यात येतो. संशोधनाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर आविष्कार स्पर्धा होतात.
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी युवारंग महोत्सव घेण्यात येतो. संशोधनाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर आविष्कार स्पर्धा होतात. याच धर्तीवर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करून त्यातील उत्कृष्ट खेळाडूंसाठी खान्देशस्तरीय क्रीडा महोत्सव घेण्याचे नियोजन असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. पी.पी.पाटील यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली. तसेच कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत खान्देशातील उद्योजकांच्या सहकार्याने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जातील. त्यासाठी औद्योगिक सहकार्य कक्ष विद्यापीठात स्थापन करून त्यात लघु, मोठय़ा उद्योगांची नोंदणी केली जाणार असल्याचेही कुलगुरू डॉ.पाटील यांनी सांगितले.
प्रा.डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास मंगळवारी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासोबत विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी त्यांनी तीन महिन्यांच्या कार्यकाळात राबविलेल्या विविध योजना, व्हिजन याबाबत मनमोकळा संवाद साधला.
प्रश्न- कौशल्य विकास कार्यक्रमांबाबत कुठल्या धोरणावर काम सुरू आहे?
प्रा.डॉ.पाटील- विद्याथ्र्याना उपयोगात येईल असे कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे आहेत. खान्देशातील उद्योजकांच्या सहकार्याने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी जैन इरिगेशन, निर्मल सीड्स यांच्याशी चर्चा सुरू आहे. जमीन ते प्रयोगशाळा ते उद्योग या उपक्रमाला आपण औद्योगिक सहकार्य कक्षाची जोड देऊ. त्यात खान्देशातील सर्व लघु, मध्यम व इतर उद्योगांची नोंदणी केली जाईल. या उद्योगांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाच्या संदर्भात प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविला जाईल. तसेच विद्यापीठाकडे परिषदा व इतर कार्यक्रमांतर्गत येणारे उद्योगांशी संबंधित तज्ज्ञ, अधिकारी खान्देशातील उद्योगांना भेट देऊ शकतील. जे तज्ज्ञ, अभ्यासक उद्योगांना भेटी देण्यासाठी येतील त्यांना विद्यापीठातही विद्याथ्र्याशी संवाद साधण्यासाठी आणले जाईल.