एलसीबीचे निरीक्षक यांच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे महावीर जैनच्या कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:40+5:302020-12-07T04:10:40+5:30

जळगाव : बीएचआरच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याशी संबंधित मुळ कागदपत्रे हे महावीर जैन ...

Original documents related to LCB inspector in Mahavir Jain's office | एलसीबीचे निरीक्षक यांच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे महावीर जैनच्या कार्यालयात

एलसीबीचे निरीक्षक यांच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे महावीर जैनच्या कार्यालयात

Next

जळगाव : बीएचआरच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याशी संबंधित मुळ कागदपत्रे हे महावीर जैन याच्या कार्यालयात झडतीच्यावेळी आढळून आले आहेत. जैन याची सीए म्हणून नियुक्ती होण्याआधीच हे कागदपत्रे तेथे कशी आली? याशिवाय करण बाळासाहेब पाटील या कर्जदाराची साडे तीन कोटी रुपयांच्या कर्जाची मुळ फाईल देखील जैन याच्या कार्यालयात आढळून आली. मुळात लेखापरिक्षण अहवालाशी त्याचा काहीही संबंध नाही असेही तपासात निष्पन्न झाले असून याची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती तपासाधिकाऱ्यांनी रविवारी पुणे न्यायालयात दिली.

बीएचआरमधील अपहार व फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या सनदी लेखाधिकारी धरम किशोर सांखला (४०,रा.शिव कॉलनी), महावीर मानकचंद जैन (३७,रा.गुड्डूराजा नगर),ठेवीदार संघटनेचा अध्यक्ष विवेक देविदास ठाकरे (४५,रा.देवेंद्र नगर) सुजित सुभाष बाविस्कर (वय ४२, रा.पिंप्राळा) व कंडारेचा वाहन चालक कमलाकर भिकाजी कोळी (२८,रा.के.सी.पार्कमागे, जळगाव) या पाच जणांच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपली. त्यामुळे त्यांना रविवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्या.एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी अडीच असे साडेतीन तास कामकाज चालले. अटकेतील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळावी म्हणून तपास यंत्रणेने मागणी केली होती, मात्र न्यायालयाने दोन्ही बाजुकडील युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली.

पोलिसांनी न्यायालयात अटकेतील आरोपीबाबत काय सांगितले

१) महावीर जैन : (अपहार उघड होऊ नये म्हणून खोटे मत नोंदविले)

महावीर जैन याच्या घर, कार्यालय, बँक लॉकर्स व इतर आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक व कंडारे याच्याशी संबंधित पुरावे मिळून आले आहेत. अवसायक कंडारे याने सहकार आयुक्त व निबंधक यांना पाठविलेल्या पत्रात मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करताना ठेवीदारांच्या ठेवी वर्ग केल्याचे नमूद केले नाही. याबाबतचे पत्र जैन याच्या कार्यालयात आढळून आले. ही बाब जैन याने लेखापरिक्षणात जाणूनबुजून कंडारेला मदत करण्याच्या हेतूने लपवून ठेवले व खोटा दस्ताऐवज तयार करुन ते खरे असल्याचे भासविले.

करण बाळासाहेब पाटील यांच्या साडे तीन कोटी रुपयांची कर्जाची मूळ फाईल आढळून आली असून त्याचा लेखापरिक्षणाशी काहीही संबंध नसल्याचे तपासात उघड झालेले आहे. कंडारे हा मोठ्या कर्जाच्या फाईल जैन याच्याकडे पाठवित असल्याचे उघड झाले. लेखापरिक्षणाशी संबंध नसलेला तक्रारदार अन्वर अहमद अत्तार याच्या तक्रारी अर्जाची छायांकित प्रतही मिळालेली असून त्याच्या ठेवीची रक्कम ७ लाख ६० हजार ५७३ पैकी फक्त ३५ टक्के रक्कम त्याला परत मिळाली आहे.

कंडारे याने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक यांना दिलेल्या स्पष्टीकरणाचे मूळ कागदपत्रे जैन याच्या कार्यालयात आढळून आली आहेत. ते कागदपत्रे त्याच्याकडे येण्याचा संबंधच नाही. महावीर जैन याची शासनाच्या पॅनलमध्ये नसतानाही कंडारेनी सनदी लेखाधिकारी म्हणून नियुक्ती केली. कंडारेच्या काळातील अपहार उघड होऊ नये यासाठी जैन खोटे व दिशाभूल करणारे मत नोंदवत होता.

विवेक ठाकरे : (वेगवेगळ्या नावांनी ठेवीदारांकडून घेतले पैसे)

विवेक ठाकरे याने ठेवीदारांकडून पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली सभासद शुल्क १०००, पाठपुरावा शुल्क ७१००, प्रोसेसिंग शुल्क १२०० असे एकूण ९३०० रुपये आणि ठेवीचे पैसे परत मिळाल्यानंतर २० टक्के कमीशन रोखीने किंवा धनादेशाने चार प्रकारे घेतले आहे. यात ठेवीदारांची फसवणूक केली आहे. ठाकरे हा पुण्यातील सारसबाग, आयबी रेस्ट हाऊस येथे ठेवीदारांच्या बैठका घ्यायचा. त्याची नोंदणी असलेल्या संघटनेची नोंदणी सहायक कामगार आयुक्तांनी २०१८ मध्ये रद्द केली होती. त्यानंतर त्याने जनसंग्राम बहुजन लोकमंच या नावाने संघटना उघडून ठेवीदारांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली. घरझडतीत ठेवीदारांचे कोरे धनादेश व शंभर रुपये किमतीचे कोरे स्टॅम्प पेपर व ठेवीच्या मूळ पावत्या आढळून आल्या आहेत. महावीर जैन, ठाकरे, सुजीत वाणी व कंडारे हे सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सीडीआरमधून स्पष्ट झाले आहे.

धरम सांखला : (अनोळखी ठेवीदारांच्या पावत्या वर्ग करुन स्वत:चे साडे चार कोटीचे कर्ज केले निरंक)

पतसंस्थेचा लेखापरिक्षक असल्याचे धरम साखला याने मान्य केले आहे. कंडारेला गैरव्यवहार करण्यासाठी त्याने मदत केली आहे. लेखापरिक्षक असतानाही स्वत: तसेच कुटुंबाच्या नावे संस्थेकडून साडे चार कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज घेतले आहे. हे कर्ज फेडीसाठी अनोळखी ठेवीदारांच्या पावत्या कर्जात वर्ग करुन कंडारेच्या संगनमताने निरंक केले आहे.

सुजीत वाणी (कंडारेच्या गैरकामात मदत)

लिलावाच्या मालमत्तेची मूल्यांकन वारंवार स्वत:च्या सोयीने कंडारे बदलवून घेत होता. त्यासाठी त्याला व्हॅल्युअर अविनाश सोनी मदत करीत होता. एफडी मॅचिंग करता बनविण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्राचा ड्रॉफ्ट कंडारे याच्या संगणकात होता. हे ड्राफ्ट प्रिंट करुन एजंट व कर्जदारांकडे देण्याचे काम सुजीत वाणी करायचा. कंडारे याच्या सांगण्यावरुन कार्यालयातील फाईल काढून त्या जैन याच्या कार्यालयात नेण्यात येत होते. तेथेच कंडारे व जैन यांच्यात चर्चा व्हायची.

कमलाकर कोळी : (कंडारेच्या प्रत्येक हालचालीची माहिती)

कमलाकर हा कंडारेकडे चालक होता. अतिशय विश्वासू होता, त्यामुळे कंडारे प्रत्येक गोपनीय कामाला कमलाकर यालाच सोबत नेत होता. त्यामुळे त्याची प्रत्येक हालचाल कमलाकरला माहिती आहे. जळगावात कंडोरेकडे छाप्याची कारवाई सुरु होती, तेव्हा कमलाकर हा कंडारेसोबत अहमदनगर येथे मुक्कामी होता. छाप्याची माहिती होताच, कंडारे पसार झाला, मात्र त्याला कोठे सोडले त्याची तो माहिती देत नाही.

Web Title: Original documents related to LCB inspector in Mahavir Jain's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.