‘अनाथांच्या आई’नं लिहितं केलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:53 AM2019-06-20T00:53:32+5:302019-06-20T00:53:46+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक डी.बी.महाजन....
गत ३५ वर्षांपासून रोजनिशी लिहिण्याची सवय आहे़ ‘अनाथांच्या आई’ असलेल्या डॉ.सिंधूताई सपकाळ यांच्या सहवासातील आठवणी लिहून काढल्या़ मला भावलेल्या माई, तिचं वेगळंपण जगासमोर यावं म्हणून मी हे अनुभव मित्रवर्य दिनेश दगडकर, रामचंद्र पाटील आणि विनय यांना कथन केले़ या अनुभवांना शब्दबद्ध करण्याचा त्यांनी आग्रह धरला़ एके दिवशी माईना फोन करून माझी भावना व्यक्त केली़ माई पटकन म्हणाली, ‘लिही बाळा लिही. लिहून तुझी मनाची कवाडं उघडणार असतील आणि मन मोकळं होणार असेल, तर याकामी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी आहे़’
माईच्या या आशीर्वचनानंतर मी लेखनास प्रारंभ केला़ त्यातूनच ‘अनाथाची आई’ या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे़ या लेखन कार्यात माझी पत्नी निर्मला हिचं पाठबळ मिळालं आहे़ मार्इंचा २५ वर्षांचा सहवास आणि या मातेचा स्पर्श मला प्रेरणा आणि ऊर्जा देत होता़ या भावविश्वातील खऱ्या प्रेरणास्त्रोत माईच़ त्यांच्या दीर्घ सहवासातूनच माझं वैचारिक आणि भावनिक विश्व समृद्ध झालेलं आहे़
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस अनामिक मद्यपी या जागतिक संघटनेच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार व्हावा या प्रांजल हेतूनं काही लेख, मद्यप्यांच्या सत्य कहाण्या शब्दांकित करून नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत़
नामोल्लेख केलेले सर्व माझे मित्र, सहकारी आणि माझ्या माई यांच्या लेखन प्रेरणेतूनच लिखाण करणं शक्य झालेलं आहे़
यापूर्वी सुमारे २५-३० वर्षांआधी मार्इंचं स्वलिखित ‘मी वनवासी’ हे चरित्रपर पुस्तक लिहिलेलं होतं. ते माझ्या वाचनात आलं. त्यातून मार्इंचा असलेला संघर्ष आणि विधायक कार्य ध्यानात आलं. त्यामुळे ती उर्जा घेऊन मीदेखील मार्इंच्या आयुष्यावर काही तरी लिहावं, असं वाटत होतं. त्या पुस्तकाची प्रेरणादेखील मला लिहितं करण्यासाठी प्रेरीत करून गेली. अनाथांची आई या पुस्तकाचे भाषांतर उर्दू आणि गुजराथी या भाषेत झालेली असून, कानडी भाषेत अनुवाद सुरू आहे. त्यावेळी माई असं म्हणते, की ‘मी वनवासी हा माझा संघर्ष असून, माझ्या मानस पुत्रानं लिहिलेलं अनाथांची आई हे पुस्तक माझा उत्कर्ष आहे.’
-डी.बी.महाजन, जळगाव