इतर परीक्षा होतात, मग एमपीएससी का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 09:25 PM2021-03-11T21:25:40+5:302021-03-11T21:25:51+5:30
परीक्षेची तयारी करणा-यांमध्ये नाराजी : वय निघत चालले
जळगाव : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय़ या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर परीक्षा होत असताना, एमपीएससीचीचं परीक्षा का होत नाही? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परिक्षा ही १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात ही परीक्षा १६ उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार होती. सुमारे सहा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी हॉलतिकिट सुध्दा देण्यात आले होते़ मात्र, परीक्षा दोन दिवसांवर असताना अचानक गुरुवारी दुपारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ही पुढे ढकलण्यात आल्याबाबत राज्य सरकारकडून सांगण्यात आले. परिणामी, वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
यापूर्वीही हॉलतिकिट दिले गेले होते...
१४ मार्चला एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार असल्यामुळे परीक्षार्थींना हॉल तिकिट सुध्दा देण्यात आले होते. मात्र, परीक्षा तोंडवर असताना ती अचानक रद्द करण्यात आली. यापूर्वी सुध्दा परीक्षेचे हॉल तिकिट देण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्य खेळत असल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
मग, एमपीएससी का नाही?
- एकीकडे निवडणूका होतात, शाळा व महाविद्यालयातील मुलांच्या परीक्षाही होत आहेत. मग, एमपीएसीच्या परीक्षा का होत नाही? असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा राज्य शासनाने विचार करायला हवा होता.
- मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात. त्याठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमतात. त्यावेळी कोरोना फैलावत नाही. फक्त परीक्षा घेतली की कोरोनाचा उद्रेक वाढेल का? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला जात आहे.
- वारंवार या ना त्या कारणाने परीक्षा पुढे ढकलली जात आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्यांशी खेळत असून रोजगार मिळत नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली.
चौथ्यांदा परीक्षा रद्द
एमपीएससीची ही परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी मार्च-२०२० मध्ये होणार होती. त्यानंतर ऑक्टोंबर-२०२० व जानेवारी-२०२१ मध्ये ही परीक्षा होणार होती. मात्र, ती पुन्हा ढकलण्यात आल्यामुळे आता १४ मार्चला परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, आता ती परीक्षा सुध्दा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो़ सलग चौथ्यांदा परीक्षा तोंडावर असताना, मध्येच ही सरकार परीक्षा रद्द करण्यात आली़. हे सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे़ आम्ही एमपीएससी करणारे विद्यार्थी गरीब शेतक-यांची मुले आहोत, जर अशी दोन तीन वर्ष जर आमची वाया गेली तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यातल्यात्यात अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जे मुले वयाच्या अटीतून बाद झाले आहे़ त्यांच्या भवितव्याची दखल कोण घेणार? सरकार दखल घेणार? का?
- संतोष कृपाळ
परीक्षा रद्द निर्णय घेणा-या सरकारचा जाहीर निषेध करतो. अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहे. परीक्षा होईल, असे दर तीन ते चार महिन्यांनी कुटूंबियांना सांगून त्यांना आशेचे किरण दाखवित आहे. पण, राज्य सरकारच्या राजनैतिक आणि अतिशय भोंगळ कारभाराने आमची परिस्थिती झाली आहे कि, बाप घरात जेवू देईना व आई बाहेर भीक मागू देईना. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ परीक्षा घ्याव्यात.
- राहुल गायकवाड
मागे पण परीक्षेचे आयोजन केले व परीक्षा एक दिवसावर असताना ती रद्द केली. विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही. असे कारण देण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही, हे सरकारला कसे माहित. मग, एका विद्यार्थ्याचा अभ्यास न झाल्यामुळे परीक्षा रद्द करणार का?. आताही जो निर्णय घेतला आहे. तो चुकीचा असून राज्य सरकारने त्वरित परीक्षेसंदर्भात विचार कराव व परीक्षा घ्यावी.
- नरेंद्र समर्थ