इतर परीक्षा होतात, मग एमपीएससी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:23+5:302021-03-13T04:28:23+5:30

जळगाव : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय़, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित ...

Other exams happen, then why not MPSC? | इतर परीक्षा होतात, मग एमपीएससी का नाही?

इतर परीक्षा होतात, मग एमपीएससी का नाही?

Next

जळगाव : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय़, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर परीक्षा होत असताना, एमपीएससीचीच परीक्षा का होत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, या निर्णयाचा विद्यार्थ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा ही १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात ही परीक्षा १६ उपकेंद्रांवर सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार होती. सुमारे सहा हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार होते. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी हॉल तिकीटसुद्धा देण्यात आले होते़ मात्र, परीक्षा दोन दिवसांवर असताना अचानक गुरुवारी दुपारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ही पुढे ढकलण्यात आल्याबाबत राज्य सरकारकडून सांगण्यात आले. परिणामी, वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यापूर्वीही हॉल तिकीट दिले गेले होते...

१४ मार्चला एमपीएससीची पूर्व परीक्षा होणार असल्यामुळे परीक्षार्थींना हॉल तिकीटसुद्धा देण्यात आले होते. मात्र, परीक्षा तोंडावर असताना ती अचानक रद्द करण्यात आली. यापूर्वीसुद्धा परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आले होते, अशी माहिती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

मग एमपीएससी का नाही?

- एकीकडे निवडणुका होतात, शाळा व महाविद्यालयातील मुलांच्या परीक्षाही होत आहेत. मग, एमपीएसीच्या परीक्षा का होत नाहीत, असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा राज्य शासनाने विचार करायला हवा होता.

- मंत्र्यांचे दौरे, मेळावे होतात. त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते जमतात. त्या वेळी कोरोना फैलावत नाही. फक्त परीक्षा घेतली की कोरोनाचा उद्रेक वाढेल का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

- वारंवार या ना त्या कारणाने परीक्षा पुढे ढकलली जात आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत असून रोजगार मिळत नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली.

चौथ्यांदा परीक्षा रद्द

एमपीएससीची ही परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी मार्च-२०२० मध्ये होणार होती. त्यानंतर ऑक्टोबर-२०२० व जानेवारी-२०२१ मध्ये ही परीक्षा होणार होती. मात्र, ती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता १४ मार्चला परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, आता ती परीक्षासुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो. सलग चौथ्यांदा परीक्षा तोंडावर असताना, मध्येच ही परीक्षा रद्द करण्यात आली. हे सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे. आम्ही एमपीएससी करणारे विद्यार्थी गरीब शेतकऱ्यांची मुले आहोत, अशी दोन-तीन वर्षे जर आमची वाया गेली तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यातल्या त्यात अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. जी मुले वयाच्या अटीतून बाद झाली आहेत, त्यांच्या भवितव्याची दखल कोण घेणार? सरकार दखल घेईल का?

- संतोष कृपाळ

-----------------

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करतो. अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहे. परीक्षा होईल, असे दर तीन ते चार महिन्यांनी कुटुंबीयांना सांगून त्यांना आशेचे किरण दाखवीत आहे. पण, राज्य सरकारच्या राजनैतिक आणि अतिशय भोंगळ कारभाराने आमची अशी परिस्थिती झाली आहे की, बाप घरात जेवू देईना व आई बाहेर भीक मागू देईना. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ परीक्षा घ्याव्यात.

- राहुल गायकवाड

-----------------

मागे पण परीक्षेचे आयोजन केले व परीक्षा एक दिवसावर असताना ती रद्द केली. विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही, असे कारण देण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही, हे सरकारला कसे माहीत. मग, एका विद्यार्थ्याचा अभ्यास न झाल्यामुळे परीक्षा रद्द करणार का? आताही जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा असून राज्य सरकारने त्वरित परीक्षेसंदर्भात विचार करावा व परीक्षा घ्यावी.

- नरेंद्र समर्थ

-------------------

उपकेंद्र - १६

परीक्षार्थी- सुमारे ६०००

Web Title: Other exams happen, then why not MPSC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.