मक्तेदाराने आणलेली चोरीची वाळू दुसऱ्या माफियांनी पळवली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 09:34 PM2019-11-19T21:34:12+5:302019-11-19T21:34:32+5:30
जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम ...
जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले. मात्र, वाळूअभावी हे काम देखील संथ गतीने सुरु आहे. मक्तेदाराने काम सुरु व्हावे यासाठी काही वाळू व्यावसायिकांच्या मदतीने बेकायदेशिर पध्दतीने आणलेली वाळू देखील रात्रीच्या वेळेस वाळू माफियांनी चोरून नेल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.
३० सप्टेंबरपर्यंतच जिल्ह्यातील वाळूच्या ठेक्यांची मुदत होती. ही मुदत संपली असून नवीन ठेक्यांचे लिलाव अद्याप प्रशासनाकडून सुरुकरण्यात आलेले नाही. शासनाकडून सुरु असलेल्या रस्त्यांचे काम देखील बंद आहेत. दरम्यान, आव्हाणे येथे सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. २०० मीटरच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरु असल्याने ग्रामस्थांनी संबधित मक्तेदाराला हे काम लवकर करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर मक्तेदाराने काही वाळू व्यावसायिकांकडून वाळू खरेदी केली. शुक्रवारी दुपारी पाच ते सहा डंपर वाळू काम सुरु असल्याचा ठिकाणी टाकण्यात आली होती. मात्र, रात्रभरातच काही माफियांनी रस्त्याचा कामासाठी टाकण्यात आलेली वाळू देखील लांबवली. त्यामुळे ‘चोरावर मोर शिरजोर’ असल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.
तेरी भी चूप मेरी भी चूप
सध्या वाळू ठेके बंद असल्याने आणलेली वाळू ही बेकायदेशिरच समजली जाणार आहे. त्यामुळे मक्तेदाराने चोरलेल्या वाळू बाबत तक्रार देखील केली नाही. या प्रकरणात मक्तेदारालाही चुप्पी साधतच बसावे लागले. दरम्यान, वाळू ठेके बंद असले तरी तरीही बांधकामे सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गिरणा व तापी नदीला काही महिन्यांपासून प्रचंड पूर असल्याने वाळू उपसा पुर्णपणे बंद होता. मात्र, आता गिरणेतील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे वाळू माफियांनी गिरणेचे पुन्हा लचके तोडायला सुरुवात झाली आहे.
रात्रीच्या वेळेस कानळदा रस्त्यावरून जाणेही कठीण
रात्री १० वाजेनंतर वाळू माफियांकडून वाळू उपसा करायला सुरुवात होते. पहाटे ६ वाजेपर्यंत प्रशासनाच्या नाकावर टीच्चून वाळू माफियांकडून सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. आव्हाणे व निमखेडी भागातील गिरणा नदीपात्रात सर्वाधिक उपसा होत आहे. रात्री १० वाजेनंतर कानळदा रस्त्यालगत भरधाव वेगाने वाळूचे डंपर व ट्रॅक्टर धावत असल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करणे देखील मोठे जिकरीचे झाले आहे. महसूल प्रशासन मात्र या प्रकरणी आंधळेपणाचीच भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.