१५ पैकी फक्त भुसावळ तालुका हगणदरीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2017 12:05 AM2017-03-05T00:05:47+5:302017-03-05T00:05:47+5:30
शौचालये उभारणीकडे दुर्लक्ष : वाईट स्थिती असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश
जळगाव : हगणदरीमुक्तीबाबत खराब कामगिरी असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. या आठ जिल्ह्यांमध्येही जळगाव मागेच असून, अजून दोन लाख ४१ हजार व्यक्तिगत लाभाची शौचालये उभारण्याचे मोठे उद्दीष्ट जळगावला पूर्ण करायचे आहे.
२०१६-१७ मध्ये जिल्ह्यास ८० हजार शौचालये बांधायची होती. त्यातील फक्त ३८ हजार शौचालये आतापर्यंत उभारण्यात आली. या महिनाअखेरपर्यंत तब्बल ४२ हजार शौचालये जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला उभारायची आहेत.
तर २०१७-१८ या वर्षात म्हणजेच पुढील वर्षभरात दोन लाख शौचालये बांधायची आहेत. पण या कामासंबंधी अशीच संथ गती राहिली तर हे उद्दीष्ट कसे पूर्ण होईल, अशी चिंता राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीणा यांनी गुरुवारीच आढावा बैठकीमध्ये व्यक्त केली.
राज्यात नाशिक, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये व्यक्तीगत शौचालये उभारणीसंबंधीचे कामकाज संथ आहे. या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत फक्त भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला आहे. अलीकडेच या तालुक्याचा पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. पं.स.सभापती राजेंद्र चौधरी यांनी सन्मान स्वीकारला होता.
जिल्हा प्रशासनातर्फे हगणदरीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे.
मात्र अनेक ठिकाणी सामूहिक शौचालये नाहीत, ज्या ठिकाणी आहेत, तेथे पाण्याचा व स्वच्छतेचा अभाव असल्याने त्यांचा वापर होत नाही. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
शौचालयांची कामे दिवाळीनंतर सुरू झाली. आता कामांना वेग आला आहे. रोजचे अहवाल येत असून, त्यात कामाची गती दिसून येत आहे. या वर्षातील लक्ष्यांक महिनाअखेर पूर्ण होईल. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही पथनाट्य, दृक् माध्यमातून जनजागृती ग्रामपातळीवर केली. लोकांची मानसिकता बदलल्याशिवाय खºया अर्थाने यश मिळणार नाही.
-राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
जलसंपदामंत्र्यांच्या मतदारसंघात बिकट स्थिती
जलसंपदामंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात ९२ ग्रा.पं. आहेत. यातील अपवाद वगळता एकही ग्रा.पं. हगणदरीमुक्त झालेली नाही. या तालुक्याची हगणदरीमुक्तीसंबंधीची टक्केवारी ३६.५३ एवढी आहे.