जळगाव जिल्ह्यात ३४२ नवीन हिस्ट्रीशीटर निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:24 PM2018-10-07T12:24:57+5:302018-10-07T12:25:38+5:30
घरफोड्यांबाबत चिंता
जळगाव : शेतातील विद्युत पंप, ठिबक नळ्या, शेळी, म्हैस यासह इतर मुकी जनावरे व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या ३४२ जणांना नवीन हिस्ट्रीशीटर म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर घेण्यात आले आहे.
दरम्यान, शहर व जिल्ह्यात वाढलेल्या घरफोडींबाबत चिंता व्यक्त करत या घटना रोखणे व उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
घरफोडीच्या घटना उघडकीस का येत नाही?
घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असताना त्या उघडकीस का येत नाही याबाबत पोलीस अधीक्षक शिंदे यांनी प्रभारी अधिकाºयांना जाब विचारला. प्रत्येक गुन्हेगारावर निगराणी ठेवण्याबाबतही त्यांनी तंबी दिली. गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल तसेच पारोळा, भडगावसह अन्य ठिकाणी महत्वाचे गुन्हे उघडकीस आणणाºया अधिकारी व कर्मचाºयांचे कौतुक करायला शिंदे विसरले नाहीत. यावेळी अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, प्रशांत बच्छाव यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आगामी नवरात्रोत्सव व मुख्यमंत्र्याच्या दौºयाच्या तयारीबाबत आढावा घेण्यात आला.
सट्टा पेढी मालक रडारवर
सांगली जिल्ह्याच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातही सट्टा पेढी मालकावर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अधीक्षक शिंदे यांनी दिले. नामांकित व व्हाईट कॉलर सट्टा चालकच रडारवर आहेत, जिल्ह्यातून त्यांची माहिती मागविण्यात येत आहे. त्याशिवाय एमपीडीए व मोक्कासाठी गुन्हेगारांची माहिती मागविण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हाभरात अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईचीही माहिती शिंदे यांनी घेतली.